पश्चिम बंगालसहीत अन्य तीन राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये आज मतदान पार पडत आहे. पश्चिम बंगालमध्ये आज ३१ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राज्यातील कूच बिहारमध्ये एक सभा घेतली. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. त्यांनी पहिल्या दोन टप्प्यांमधील मतदानानंतरच ममता दीदी सत्तेतून जाणार हे निश्चित असल्याचा दावा केला. भाजपाच्या ४१ व्या स्थानपा दिनानिमित्त मोदींनी आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही संबोधित केलं.

मोदींनी आपल्या भाषणामध्ये पश्चिम बंगाल राज्यात भाजपाचीच लाट असल्याचा दावा केलाय. या लाटेने ममता दीदींच्या गुंडांना चारही बाजूंनी घेरलं आहे, असंही मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावरही टीका केली. “पहिल्या दोन टप्प्याच्या मतदानामध्येच ममता दीदी सत्तेतून बाहेर जाणार हे स्पष्ट झालं आहे. अनेकांनी घराबाहेर पडत आमच्या पक्षाला मतदान केलं आहे. बंगालमध्ये भाजपाचीच लाट आहे. या लाटेमध्ये दीदींचे गुंड आणि त्यांच्या भाच्याला घेरलं आहे,” असं मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदींनी भाजपाचा पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय होईल असा दावा केलाय. “२ मे रोजी निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राज्यात भाजपाची सरकार आल्यावर येथे विकास कामं अधिक वेगाने केली जातील. तुमचा आशिर्वाद ही माझ्यासाठी खूप मोठी शक्ती आहे. तुम्ही मला जे काही प्रेम देत आहात ते मी दोन मे रोजी भाजपाची सरकार सत्तेत आल्यानंतर व्याजासकट परत करेन. मी ते या भागाचा विकास करुन फेडेन,” असंही मोदी म्हणाले.

बॅनर्जी यांनी मुस्लीम मतदारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुनही मोदींनी टोला लगावला. “तसं तर तुम्ही निवडणूक आयोगाला शिव्या देत असता दीदी, मात्र आम्ही सर्व हिंदूंनी एकत्र यावं आणि भाजपाला मतदान करावं असं म्हटलं असतं तर आम्हाला निवडणूक आयोगाने आठ ते दहा नोटीस पाठवल्या असत्या. साऱ्या देशातील संपादकीय पानं आमच्या विरोधात छापली गेली असती,” असा टोला मोदींनी लगावला.

पुढे बोलताना मोदींनी, “याच निवडणूक आयोगाने दोनदा निवडणूक घेऊन तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं. आज तुम्हाला त्याच निवडणूक आयोगाचा त्रास होऊ लागला. यावरुनच दिसून येत आहे की तुम्ही निवडणूक हरला आहात,” असं म्हटलं.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाषणामध्ये भाजपाची देवाशी तुलना करण्यावरुन केलेल्या टीकेलाही मोदींनी उत्तर दिलं आहे. “मी सध्या असं ऐकलं आहे की दीदी सगळीकडे प्रश्न विचारत फिरत आहेत की, भाजपा काही देव आहे का त्यांना पहिल्या दोन टप्प्यांमध्येच कळलं की भाजपाला मोठा विजय मिळणार आहे. माननीय दीदी, आम्ही तर सर्वसामान्य लोकं आहोत आणि देवाच्या आज्ञेनुसार आणि त्याच्या आशिर्वादाने आम्ही देशसेवा करत आहोत,” असा टोला मोदींनी लगावला. “दीदी तुमचा राग, नाराजी, तुमची वागणूक, बोलणं सारं काही ऐकून लहान पोरगंही सांगेल की तुम्ही निवडणुक हरला आहात,” असंही मोदी यावेळी म्हणाले. “निवडणुकीमध्ये कोण जिंकलं कोणं हरलं हे जाणून घेण्यासाठी देवाला त्रास देण्याची गरज नाहीय. जनताच देवाचं रुप आहे. जनतेला पाहूनच तुम्हाला समजतं की वारं कोणत्या दिशेने वाहत आहे,” असंही मोदी म्हणाले.