मोदीजी पावसामुळे लढाऊ विमानं रडारवरून गायब होतात का? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ मे रोजी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत, एअर स्ट्राईकच्या आधी ढगाळ वातावरण असल्याने हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते. मात्र भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो असा सल्ला दिल्याचं मोदी म्हटले होते. याच वक्तव्यावरून राहुल गांधी यांन पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. खराब हवामानामुळे जर विमानं रडारवर दिसत नाहीत तर मग पाऊस पडल्यावर ही विमानं गायब होतात का? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे.

तुम्ही जनतेला आंबे कसे खाता ते सांगितलं, कुर्ता कसा घालायचा हे शिकवण्याचा प्रयत्न केला मात्र बेरोजगारीचं काय? वर्षाला २ कोटी रोजगारांचं आश्वासन दिलं होतं त्याचं नेमकं काय झालं? याचंही उत्तर द्या असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मध्यप्रदेशात झालेल्या एका रॅलीत राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधानांची खिल्ली उडवली आहे. ढगाळ वातावरणासंबंधीचे ते ट्विटही भाजपाने डिलिट केले होते. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात मोदींना लक्ष्य करण्याची एकही संधी विरोधक सोडताना दिसत नाहीत. ढगाळ वातावरणावरून जेव्हा नरेंद्र मोदींनी बालाकोट एअर स्ट्राईकसंदर्भातले जे वक्तव्य केले त्यावरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने टीका केली होती. आज राहुल गांधी यांनी त्या वक्तव्यावरून मोदींची खिल्ली उडवली आहे.