लोकशाहीची गळचेपी होते आहे असं म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दिली आहे. मतदान हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी एंजॉय करणारे आणि मतदानाकडे पाठ फिरवणारे लोक या देशाचे क्रमांक एकचे शत्रू आहेत असंही परखड मत त्यांनी व्यक्त केलं. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होण्याची गरज आहे अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. मुंबईतील विले पार्ले या ठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

देशात सातत्याने लोकशाही धोक्यात आहे, लोकशाहीची गळचेपी होते आहे असं बोललं जातं त्यावर तुमचं मत काय? असं विचारलं असता कोण असं म्हणतं त्यांना समोर आणा! मी आत्ता माझं मत मांडतो आहे, इथे प्रत्येकजण मत मांडू शकतो, यांना मतदान करा किंवा करू नका हे सांगू शकतो अशावेळी गळचेपी होते आहे अशी ओरड करणारी माणसं आहेत कोण? त्यांना माझ्यासमोर आणा असं आव्हानच विक्रम गोखले यांनी दिलं. इतकंच नाही तर लोकशाहीची गळचेपी होते असं म्हणणाऱ्यांना थोबडवून काढलं पाहिजे असंही मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रात लोकसभेसाठी जे मतदान झालं त्याचा चौथा टप्पा होता. मुंबईसह अनेक भागांमध्ये मतदान झालं. या मतदानाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मतदानासाठी लोकांनी बाहेर पडलंच पाहिजे. पाच वर्षांनी एकदा आपल्याला ही संधी मिळते आपल्यावर कुणी राज्य करावं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे आणि तो अधिकार आपण बजावलाच पाहिजे असंही विक्रम गोखलेंनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर प्यायचं पाणी फेकून देणं हा देखील एक मोठा गुन्हा आहे असं मी मानतो. पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर होत चालला आहे. माझ्याकडे आलेल्या माणसालाही मी विचारतो किती पाणी पिणार ते सांगा? अर्धा ग्लास, पाऊण ग्लास. ते संपवा असंही मी बजावतो कारण उरलेलं पाणी फेकून देणं हा गुन्हा आहे असं मी मानतो. अनेक गावांमध्ये प्यायला पाणी मिळत नाही अशावेळी पाणी जपून वापरणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबादारी आहे असंही विक्रम गोखलेंनी म्हटलं आहे.