अखिल भारतीय काँग्रेस समितीने जेव्हा केरळ प्रदेश काँग्रेस समितीकडे राहुल गांधी यांच्यासाठी केरळमध्ये सर्वात सुरक्षित मतदारसंघ कोणता ? अशी विचारणा केली तेव्हा सर्वांनी एकमताने वायनाडचे नाव सुचवले. वायनाड उत्तर केरळमध्ये असून कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या सीमेवर हा मतदारसंघ आहे. २००९ लोकसभा निवडणुकीआधी मतदारसंघ पूनर्रचनेमध्ये वायनाड हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार झाला.

पहिल्या निवडणुकीत इथून काँग्रेस नेते एम.आय.शानावास यांनी १.५३ लाखाच्या मताधिक्क्याने विजय मिळवला. २०१४ मध्ये पुन्हा ते इथून विजयी झाले. पण मताधिक्क्य घटून २० हजारवर आले होते. या मतदारसंघातून राहुल गांधींची लढत एलडीएफचे पी.पी.सुनीर यांच्याबरोबर होणार आहे. सुनीर सीपाआयचे युवा नेते आहेत. भाजपाने ही जागा सहकारी पक्ष बीडीजेएसला दिली होती. पण राहुल गांधींच्या नावाच्या घोषणेनंतर भाजपाचा वरिष्ठ नेता आता वायनाडमधून निवडणूक लढवू शकतो.

वायनाड लोकसभा मतदारसंघात वायनाड आणि मलप्पूरम जिल्ह्यातील प्रत्येकी तीन आणि कोझीकोडेमधील एक विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. वायनाड लोकसभा मतदारसंघात एकूण सात विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. वायनाड हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. यूडीएफचा घटक पक्ष असलेल्या इंडियन युनियम मुस्लिम लीगचा या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे. मलप्पूरममधील तीन आणि कोझीकोडेमधील एका विधानसभा मतदारसंघात इंडियन युनियम मुस्लिम लीगची मोठी ताकत आहे.

वायनाड जिल्ह्यात ४९.७ टक्के हिंदू लोकसंख्या आहे तर ख्रिश्चन २१.५ टक्के आणि मुस्लिम लोकसंख्या २८.८ टक्के आहे. मलप्पूरम जिल्ह्यात ७०.४ टक्के मुस्लिम लोकसंख्या हिंदू २७.५ टक्के आणि ख्रिश्चन दोन टक्के आहेत. वायनाड लोकसभा मतदारसंघातील एकूण १३ लाख २५ हजार ७८८ मतदारांपैकी ५६ टक्के मुस्लिम मतदार आहेत. या मतदारसंघात काँग्रेसची मदार अल्पसंख्याक मतांवर आहे. राहुल गांधींची उमेदवारी जाहीर करण्याआधी काँग्रेस हायकमांडने मुस्लिम लीगच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी राहुल गांधींना पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.