लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा मिळवत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली अभूतपूर्व यश मिळवलं. तर एनडीएला ३५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. या अभूतपूर्व विजयानंतर आईचे आशीर्वाद घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुजरातमध्ये जाणार आहेत. गुजरातमध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आईची भेट घेतील. आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर परवा म्हणजे सोमवारी मी काशी येथे जाऊन सगळ्या मतदारांचे आभार मानणार आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्विटद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जशी सुरू झाली त्याआधीपासूनच विरोधकांनी विविध गोष्टी समोर आणत पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. बेरोजागरी, वाढत्या शेतकरी आत्महत्या, १५ लाखांचे आश्वासन, नोटाबंदीचा निर्णय, जीएसटी, राफेल करार या सगळ्या मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांनी पुरेपूर केला. मात्र त्या प्रयत्नांचा तसूभरही परिणाम लोकसभा निवडणुकीवर झाला नाही. देशातल्या मतदारांनी २०१४ पेक्षा जास्त विक्रमी मतांनी पुन्हा एकदा मोदींना आणि भाजपालाच सत्ता दिली.

आता या अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच रविवारी गुजरातमध्ये जाणार आहेत. तिथे जाऊन ते आईची भेट आणि आशीर्वाद घेतील आणि त्यानंतर सोमवारी सकाळी ते काशीला जाऊन, तिथल्या मतदारांचे आभार मानणार आहेत.