राजू शेट्टी यांचे सूचक वक्तव्य

सांगली : सत्ता कुणाचीही आली, तरी दूध आणि ऊस दर यासाठी केव्हाही रस्त्यावर उतरण्याचे आपणास स्वातंत्र्य असल्याचे सूचक वक्तव्य खा. राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना केले. त्यांचा हा रोख महायुतीबरोबरच आघाडीच्या दिशेने देखील होता यामुळे भविष्यातील राजकीय वाटचालीबद्दल आम्हाला कुणी गृहित धरू नये असाच असाचा त्यांचा इशारा असल्याचे मानले जात आहे.

खासदार शेट्टी म्हणाले, की काही बुद्धिवादी लोकांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवण्याची विनंती केली होती. त्यामुळेच आम्ही या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर गेलो. आजवर ज्यांच्याविरुद्ध लढलो, त्यांच्याच बाजूला जाण्यामागची आमची ही भूमिका जनतेला पटवून दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीशी सोबत केल्याने आमच्यावर साखर कारखानदारांबरोबर मांडीला मांडी लावल्याचा आरोपही होतोय; पण याचा कोणताही फटका आम्हाला या निवडणुकीत बसणार नाही. हातकणंगलेची जागा कायम राखण्याबरोबरच सांगलीची जागाही संघटनेला मिळेल. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नोटिस देऊन आणि गुन्हे दाखल करून शिवसेनेने नाहक त्रास दिल्याचाही आरोप त्यांनी केला.

शिवसेनेकडून खूप त्रास देण्यात आला. राजू शेट्टी नावाचा खास उमेदवार मुंबईवरून आणणे, त्याला शिट्टी चिन्ह देऊन प्रचार पत्रिका छापणे, ऐनवेळी निवडणूक आयोगाची नोटिस येणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे आम्हाला अडचणीत आणणारे प्रकार करण्यात आले.

शेट्टी यांनी पुढे सांगितले, की सत्ता कोणाचीही आली तरी मी शेतकऱ्यांबरोबरच राहणार आहे. ऊस व दूध दरप्रश्नी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर केव्हाही उतरण्याचे मला स्वातंत्र्य आहे. शेतकऱ्यांसाठी संघर्षांची भूमिका मी सोडणार नाही. उद्या आघाडीचे सरकार आले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. यासाठी मग त्यांच्याविरुद्धही आम्ही रस्त्यावर उतरू असे सांगत त्यांनी भविष्यात आघाडीबरोबरही आपला संघर्ष सुरूच राहणार असल्याचे संकेत दिले.