नामदेव कुंभार

लातूर मतदारसंघातील प्रचार सध्या अंतिम टप्यात पोहचला आहे. उमेदवार गावा-गावांत जाऊन प्रचार करत आहे. मात्र, लातूरमधील चाकूर तालूक्यातील सुनेगावांत अद्याप एसटी पोहचली नसल्याचे चित्र पहायला मिळतेय. सात दशकांपासून गावकरी रस्ता आणि एसटीसाठी सरकारशी लढा देत आहेत. मात्र, त्यांची हाक सरकारपर्यंत पोहचल्याचे चित्र धुसूर आहे. त्यामुळे लातूरमधील सुनेगावाने मतदानावरच बहिष्कार टाकला आहे. जोपर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत मतदान करणार नाही असे ग्रामस्थांनी ठरवले आहे.

सुनेगाव (शेंद्री) येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देत तहसीलदार यांना तसे निवेदनही दिले आहे. मात्र, अनेक निवेदने देऊनही सुनेगावातील ग्रामस्थांना अच्छे दिन आले नाहीत. या गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ५ किमीच्या अंतरासाठी २० कि मी अंतराचा फेरा मारावा लागतोय. शासकीय कामं, दवाखाना तसंच शिक्षणासाठी येथील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत आहे. गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथील ग्रामस्थांनी एस.टी. महामंडळाची गाडीही पाहिली नाही. प्रवासासाठी खासगी वाहनाचा आधार ग्रामस्थांना घ्यावा लागतो. तसेच ग्रामस्थांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे.

या गावाला रस्ता देण्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून विविध प्रकारे आंदोलने करूनही प्रशासनाने याची दखल घेतली नाही असे ग्रामस्थ सांगतात. सुनेगांव (शेंद्री)मध्ये १६० घरे असून गावची लोकसंख्या एकूण १५०० एवढी आहे. जवळजवळ या गावात ७०० मतदार आहे. २०१७ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी गाकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यानंतर प्रशासनाने त्यावेळी ग्रामस्थांच्या लोकसहभागातून तात्पुरता कच्चा रस्ता बनवून दिला मात्र हा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. सध्या येथील मन्याड नदीवरील अर्धवट पुलावरून विद्यार्थ्यांना शाळेला जाण्यासाठी कसरत करावी लागतेय. पावसामध्ये जर नदीला पाणी आले तर गावकऱ्यांच्या आडचणीत वाढ होते. त्यामुळे या अर्धवट पुलाचे काम पूर्ण करावे तसेच पक्का रस्ता देण्याच्या मागणीसाठी सुनेगांवातील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकाला आहे.