राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना बहुतेक जागांवरचे विविध पक्षांचे उमेदवारही जाहीर झाले आहेत. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्यापपर्यंत आघाडीच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही.  पुण्यात आघाडीकडून उमेदवाराची घोषणा झालेली नसताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आज कसबा गणपती पासून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी आघाडीकडून इच्छुक असणारे अरविंद शिंदे, प्रविण गायकवाड, मोहन जोशी हे प्रचारात सहभागी झाले होते.

राज्यात भाजप-शिवसेनेसह मित्र पक्षांची महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसह मित्र पक्षांची महाआघाडीने बहुतेक जागांवरील उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. मात्र, पुण्याच्या जागेसाठी महायुतीकडून पालकमंत्री गिरीश बापट यांच्या नावाची घोषणा करून आठवडा उलटला तरी देखील आघाडीचा उमेदवार अद्या निश्चित होत नाहीए. या जागेसाठी माजी आमदार मोहन जोशी, महापालिका गटनेते अरविंद शिंदे आणि नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रविण गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यामध्ये गायकवाड प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

दरम्यान, माजी आमदार मोहन जोशी यांचे नाव मागे पडले आहे. अरविंद शिंदे आणि प्रविण गायकवाड या दोघांपैकी एकाला पुण्याच्या जागेवर संधी देण्यात येईल असे सांगितले गेले होते. मात्र, अजूनही आघाडीकडून उमेदवाराची घोषणा न झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.