पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमदेवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी एक सभा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सभेसाठी वडगावशेरी या ठिकाणी आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस जेव्हा बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा एक महिला उठून उभी राहिली आणि माईक हाती घेऊन मुख्यमंत्रीसाहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हणू लागली. सभा झाली की तुमच्याशी बोलतो असे मुख्यमंत्री तिला म्हटले. त्यानंतर ही महिला खाली बसली. मात्र काही वेळाने अचानक महिला उभी राहिली आणि पुन्हा तिने बोलण्यास सुरुवात केली. तिला आवरताना पोलिसांची तारांबळ उडाली.

सदर महिलेला बाहेर काढण्यासाठी पोलीस गेले असता मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना बाजूला होण्यास सांगितले. तसेच या महिलेला बोलण्याचे आश्वसान दिले. पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वडगावशेरी येथे सभा पार पडली. यावेळी पुणे शहराचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संजय काकडे, शिवसेना नेत्या आमदार नीलम गोऱ्हे, आमदार बाबुराव पाचर्णे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.