निवडणुकीचा निकाल कोणत्याही पक्षाच्या बाजूने लागला तरी मतदानासंबंधी एक सुखद बातमी आली आहे. मतदानाची आकडेवारी समोर आली असून यानुसार १३ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांनी बाजी मारली असून त्यांची मतदान टक्केवारी जास्त आहे. विशेष म्हणजे यामध्ये उत्तर भारतातील दोन राज्ये बिहार आणि उत्तराखंडनेही स्थान मिळवलं आहे.

२०१४ लोकसभा निवडणुकीत १० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश होते जिथे महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केलं होतं. सध्याच्या यादीबद्दल बोलायचं झाल्यास, दक्षिण भारत आणि पुर्वोत्तर येथील राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश महिलांच्या मतदानाच्या बाबतीत अग्रेसर राहिले आहेत. पश्चिम भारतात फक्त गोवा आणि दमन दीवचं नाव आहे. तर उत्तर भारतातील फक्त दोन राज्यांनी यादीत स्थान मिळवलं आहे.

कोणत्या राज्यांचा समावेश ?
केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार, मणिपूर, मेघालय, पाँडिचेरी, गोवा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, मिझोराम, दमन दीव, लक्षद्वीप

केरळ, तामिळनाडूत महिलांचं जोरदार मतदान
या १३ राज्यांपैकी ११ राज्यांत २०१४ मध्ये महिला मतदारांची संख्या अधिक होती. मात्र यावेळी सर्व राज्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची टक्केवारी वाढली आहे. केरळबद्दल बोलायचं झाल्यास गेल्या वेळी पुरुषांच्या तुलनेत सहा लाख अधिक महिलांनी मतदान केलं होतं. यावेळी हा आकडा नऊ लाखावर पोहोचला आहे. तामिळनाडूतही महिला आणि पुरुष मतदारांमध्ये सहा लाखांचं अंतर आहे.

एकूण २१ लाख जास्त महिलांचं मतदान
१३ राज्यांमध्ये महिला मतदारांनी केलेली आकेडवारी पाहिली तर एकूण पुरुषांच्या तुलनेत २१ लाख अधिक महिलांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला असं म्हणावं लागेल. बिहारबद्दल बोलायचं झाल्यास येथे पहिल्या सहा टप्प्यातील मतदानात पुरुषांच्या तुलनेत १.३ लाख महिलांनी मतदान केलं. सातव्या टप्प्याची आकडेवारी आल्यानंतर काही बदल होण्याची अपेक्षा आहे.