लोकसभा निवडणुकीसाठी देशात आज पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. अमेठीमधल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून इथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध केंद्रीय मंत्री स्मृती इराणी असा सामना आहे. अमेठीमधील भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी एक व्हिडिओ टि्वट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला काँग्रेसला मतदान करण्यासाठी आपल्यावर सक्ती करण्यात आली असा आरोप करताना दिसत आहे.

त्यांनी माझा हात पकडला व काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेले बटण दाबायला लावले. मला भाजपाला मतदान करायचे होते असे ही महिला व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मतदान केंद्र ताब्यात घेतले असा आरोप इराणी यांनी केला आहे.

निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रशासन आणि निवडणूक आयोगाला सर्तक करण्यासाठी मी हा व्हिडिओ टि्वट केला. ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. राहुल गांधींना अशा प्रकारच्या राजकारणासाठी शासन करायचे की नाही ते या देशातील जनतेला ठरवायचे आहे असे इराणी म्हणाल्या. अमेठी हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला आहे. या लढतीकडे सगळया देशाचे लक्ष लागले आहे. २०१४ मध्ये राहुल गांधींनी स्मृती इराणीचा अमेठीमध्ये पराभव केला होता. पण स्मृती इराणींनी मोठया प्रमाणावर राहुल गांधींचे मताधिक्क्य कमी केले होते.