महेश बोकडे

राजकीय पक्षांनी रोख रक्कम, जेवण आणि कपडेही  दिले.

लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार सुरू असताना प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या प्रचारासाठी बांग्लादेश परिसरातील महिलांना बोलावले. या कामासाठी महिलांना प्रतिदिन निश्चित रक्कम, दोन वेळचे जेवण आणि पक्षाच्या रंगाशी संबंधित कपडेही नि:शुल्क दिले.

नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शहराचे तापमान ४१ ते ४३ अंश सेल्सिअस असल्यामुळे कार्यकर्ते मिळत नव्हते. हा प्रश्न सोडवण्यासाठी काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नवीन क्लृप्ती शोधून काढली. त्यानुसार मध्य नागपुरातील बांग्लादेश, तांडापेठ, नाईक तलाव, लालगंज, इतवारी रेल्वेस्थानकाच्या शेजारील वस्ती, डिप्टी सिग्नल, नंदनवन झोपडपट्टी, सुदाम नगरी येथील महिलांसह पुरुषांनाही दिवसाला ३५० ते ५०० रुपये रोज, दोन वेळचे जेवण, प्रचारासह रॅलीत घालण्यासाठी पक्षाच्या रंगाशी संबंधित रंगाचे कपडे दिले गेले. या भागातील बहुतेक पुरुष मोलमजुरी, रिक्षा किंवा ऑटोरिक्षा चालवण्यासह हाताला मिळेल ते काम करतात, तर महिला धुणी-भांडी करतात. प्रचारात फिरल्याने सहज पैसे मिळत असल्याने अनेकांनी राजकीय पक्षांचा हा प्रस्ताव स्वीकारला. गेल्या १५ दिवसांमध्ये येथील महिला, पुरुषांनी चांगलीच कमाई केल्याचे महिलांनी सांगितले.

घरकाम करणाऱ्यांच्या सुटय़ा वाढल्या

प्रचारात चांगले पैसे मिळत असल्याने घरकाम करणाऱ्या महिलांच्या सुटय़ा निवडणूक काळात वाढल्या. काहींनी आजाराच्या नावावर सुटय़ा घेतल्या, तर काहींनी कुटुंबात लग्न असल्याचे सांगितले.

मध्यस्थांचीही मोठी कमाई

मध्य नागपूरच्या बांग्लादेश या वस्तीसह इतरही गरीब वस्तीत महिलांसह पुरुषांची गर्दी जमवण्यासाठी काही मध्यस्थ सक्रिय होते. त्यांनी संबंधित राजकीय पक्षांकडून गर्दीसाठी किती महिला, पुरुष लागतील याची संख्या जाणून त्यानुसार नियोजन केले. राजकीय पक्षांकडून घेतलेल्या रकमेतील काही रक्कम स्वत:जवळ ठेवून इतरांना पारिश्रमिक म्हणून ३५० ते ५०० रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आली.

उपराजधानीतील बांग्लादेश, तांडापेठसह अनेक झोपडपट्टी परिसरात कष्टकरी लोक राहतात. सर्वाना निवडणुकीत आवडत्या उमेदवाराच्या बाजूने प्रचार करून तो जिंकल्यास आपले काही प्रश्न सुटू शकत असल्याचे वाटते, तर काहींना आर्थिक मदतीची अपेक्षा असते. त्यामुळे यंदाही येथील बऱ्याच जणांनी प्रचारात सहभाग घेतला.’’

– विलास भोंगाडे, कामगार नेते