मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. साध्वी प्रज्ञा यांनी त्यांच्या मुस्लीमविरोधी विधानांसाठी माफी मागितली तरच मी त्यांचा प्रचार करण्यास तयार आहे, असे सिद्दीकी यांनी सांगितले.

फातिमा या भोपाळमधील भाजपा नेत्या असून विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना भोपाळ उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत काँग्रेसच्या आरिफ अकील यांनी फातिमा यांचा पराभव केला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, फातिमा यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. “मी साध्वी प्रज्ञा यांच्यासाठी प्रचार कऱणार नाही, त्यांनी धर्मयुद्धासंदर्भात विधान केले होते. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भातही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते”, असे फातिमा यांनी सांगितले. प्रज्ञा यांनी याऐवजी विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला पाहिजे होता, असेही त्यांनी सुनावले.

फातिमा या मध्यप्रदेशचे माजी मंत्री मरहूम रसूल अहमद सिद्दीकी यांच्या कन्या आहेत. फातिमा पुढे म्हणतात, साध्वी प्रज्ञाच्या विधानांमुळे शिवराजसिंह चौहान यांची प्रतिमा मलिन झाली आहे. शिवराजसिंह यांचा मुस्लिमांशी चांगला संपर्क होता. शिवराजसिंह हे धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत,  असे त्यांनी सांगितले. काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, असा प्रश्न विचारला असता मी काँग्रेसमध्ये जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.