कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. महायुतीमधील शिवसेनेने (शिंदे) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच नगरसेवकांचा पाठिंबा घेतला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे आणि शिवसेना (शिंदे) एकत्र सत्तेत असणार असे जाहीर केले. मनसेच्या नेत्यांनीही या आघाडीचे स्वागत केले आहे. मात्र हा विषय चिंताजनक आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

आमची भूमिका फार वेगळी आणि कडवट आहे. ज्यांनी महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी आणि बेईमानी केली त्यांच्यासह राजकीय किंवा अन्य संबंध ठेवायचे नाहीत. महाराष्ट्राच्या गद्दारांना मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही. राज ठाकरेही तसे नेते नाहीत, त्यामुळे आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. कल्याण डोंबिवलीचा विषय समोर आला आहे. हा विषय अत्यंत चिंताजनक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे. जर पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतारणा करुन कोणत्याही पक्षाचं नेतृत्व विपरीत भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने कारवाई केली पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

असा निर्णय घेणाऱ्यांवर राज ठाकरेंनी कारवाई केली पाहिजे-राऊत

राज ठाकरेंनी असा निर्णय घेणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी अंबरनाथमध्ये जेव्हा भाजपाशी हातमिळवणी केली तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली. स्थानिक पातळीवर विषय आहे असं सांगून जबाबदारी संपत नाही. शिवसेना आणि मनसेने एकत्र निवडणुका लढल्या, अशा वेळी एखाद्या चिन्हावर निवडून येऊन कुणी बेडूक उड्या मारत तर त्या संदर्भात पक्षाने एक भूमिका घेतली पाहिजे. राजू पाटील बोलत असताना त्यांच्या बाजूला त्यांच्या पक्षाचे नेते उभे होते हे मी पाहिलं. शिंदेंचे लोक म्हणतात मनसे म्हणजे काय एमआयएम आहे का? पण आमच्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे आणि त्यांचा गट म्हणजे एमआयएम आहे. त्यांच्या बरोबर जाणारे बेईमान, महाराष्ट्रद्रोही आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सत्ता मिळाली नाही म्हणून अशा प्रकारे बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करु शकत नाहीत.

कल्याण डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरेंनी गांभीर्याने घेतला आहे-राऊत

कल्याण-डोंबिवलीचा विषय हा उद्धव ठाकरेंनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक आहेत. एकंदरीतच राजकारणातल्या मानसिकतेचा प्रश्न आहे. अशा प्रकारे गोष्टी करणारे हे मनोरुग्ण आहेत असं ते म्हणतात. मग शहराचा, गावाचा विकास, राज्याचा विकास पुढे देशाचा विकास म्हणून पक्षांतरं सुरु आहेत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या सगळ्या घडामोडींमुळे राज ठाकरेही व्यथित झाले आहेत.