देशभरात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेनं यंदा गोव्यामध्ये ११ जागी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकीय समीकरणं देखील नव्याने मांडली जाऊ लागली आहेत. गोवा निवडणुकांसाठी सध्या आदित्य ठाकरे प्रचार करण्यासाठी गोव्यात असून त्यांनी देखील भाजपावर तीव्र टीका सुरू केली आहे. आज पणजीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आदित्य ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधताना खोचक सवाल देखील केला आहे. गोवा निवडणुकांसाठी भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबाबदारी सोपवली असून त्यांच्या देखरेखीखाली भाजपा गोव्यात रणनीती आखत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपावर निशाणा

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपावर टीका केली आहे. “आमची जेव्हा भाजपासोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही. गेल्या ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. एनडीएमधल्या इतर पक्षांच्या पाठीत देखील खंजीर खुपसला गेला”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी भाजपावर टीका केली आहे.

प्रत्येक निवडणूक लढणार

“इथून पुढे आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार. गोव्याच्या प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असणार”, असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

“आम्ही कमकुवत आहोत, तर मग…”

दरम्यान, शिवसेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल, अशी टीका भाजपाकडून करण्यात आल्यानंतर त्यावरून आदित्य ठाकरेंनी निशाणा साधला आहे. “जर कुणाला आमचा पक्ष इतकाच कमकुवत वाटत असेल, आमचे डिपॉझिट जप्त होणार असं वाटत असेल, तर मग आमच्यावर टीका कशाला करता? आमच्याबद्दल बोलता तरी का? भिती कसली वाटतेय? होऊ दे प्रचार”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

Video: अजित पवारांच्या गाडीचं स्टेअरिंग आदित्य ठाकरेंच्या हाती

मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपातून उमेदवारी न मिळाल्यामुळे पणजीमधून अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. त्यांना शिवसेनेने पाठिंबा देत आपला उमेदवार मागे घेतला आहे. याविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “शिवसेनेनं जी काही मैत्री जपायची होती, ती खुलेपणाने जपली आहे. आम्ही उत्पल पर्रीकरांना देखील साफ आणि स्वच्छ मनाने पाठिंबा दिला आहे”.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya thackeray targets bjp in goa election shivsena campaign with sanjay raut pmw
First published on: 12-02-2022 at 12:44 IST