scorecardresearch

“अर्ध्याहून अधिक संभ्रम दूर, संघर्ष सुरूच राहणार”; निकालावर पहिल्यांदाच अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया

मतांची टक्केवारी आणि जागांमध्ये वाढ झाल्यामुळे आनंदी असल्याचे अखिलेश यादव यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते.

Akhilesh yadav spoke for the first time on the election results of Uttar Pradesh
(संग्रहित छायाचित्र)

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या प्रतिक्रियेची सर्वांनाच प्रतीक्षा होती. यावेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने १३० जागांवर आघाडी मिळवली आहे तर भाजपाने २६९ जागांसह बहुमत मिळवले आहे. यावेळी अखिलेश यादव हे सत्तेचे दावेदार मानले जात होते. अखिलेश यादव यांनी दुसऱ्या दिवशी ट्विट करून निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश यादव यांनी हे निकाल सकारात्मक पद्धतीने घेण्याचे म्हटले आहे.

“आमच्या जागा अडीच पट आणि मतदानाची टक्केवारी दीड पट वाढवल्याबद्दल उत्तर प्रदेशातील जनतेचे मनापासून आभार. भाजपाच्या जागा कमी होऊ शकतात हे आम्ही दाखवून दिले आहे. भाजपाची ही घसरण कायम राहणार आहे. अर्ध्याहून अधिक संभ्रम आणि भ्रम दूर झाला आहे, उर्वरित काही दिवसांत होईल. जनहितासाठी संघर्ष सुरूच राहणार आहे,” असे अखिलेश यादव यांनी ट्विट करून म्हटले आहे. यापूर्वी गुरुवारी निकालादरम्यान अखिलेश यादव यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नव्हती.

मतांची टक्केवारी आणि जागांमध्ये वाढ झाल्यामुळे आनंदी असल्याचे अखिलेश यादव यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जनतेने आमच्या जागा अडीच पटीने वाढवल्या. २०१७ मध्ये सपाला मिळालेल्या ४७ जागांपैकी १२५ जागा वाढल्या. याशिवाय समाजवादी पक्षाच्या मतांची टक्केवारीही वेगाने वाढून २०  टक्क्यांऐवजी ३२ टक्के झाली आहे. अशाप्रकारे सपाने मतांच्या टक्केवारीच्या बाबतीत मोठे यश मिळवले आह. पण जागांच्या बाबतीत तितके यश मिळवू शकले नाही. मतांचे विभाजन झाल्याने सपापेक्षा भाजपाला त्याचा अधिक फायदा झाला.

समाजवादी पक्षाला मतांच्या प्रमाणात खूश असण्यामागे खरे तर एक मोठे कारण आहे. २०१२ मध्ये, जेव्हा सपाला पूर्ण बहुमत मिळाले तेव्हा त्यांना २२४ जागा मिळाल्या होत्या, पण मतांची टक्केवारी केवळ २९ टक्के होती. मात्र आज त्याची मतांची टक्केवारी झपाट्याने वाढून ३२ टक्क्यांच्या पुढे गेली आहे. यामुळेच एकीकडे सपाला सरकार स्थापनेपासून मुकावे लागले असले तरी दुसरीकडे हे वाढलेले मताधिक्य त्यांच्या भविष्याची आशा आहे. या निवडणुकीचा सर्वात मोठा पैलू म्हणजे बसपच्या मतांची टक्केवारी एकदम खाली येऊन १२ टक्क्यांच्या जवळ आली आहे, जी कधीही २० टक्क्यांपेक्षा कमी नव्हती.

मराठीतील सर्व निवडणूक २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2022 at 09:48 IST

संबंधित बातम्या