उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने आतापर्यंत २६८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सपा फक्त १३० जागांवरच मर्यादित दिसत आहे. भाजपाच्या लाटेत काँग्रेस, ममता बॅनर्जी, मायावती, एमआयएमचे ओवेसी आदींची धूळधाण उडाली. काँग्रेसला पंजाबची सत्ता गमवावी लागली.त्याचवेळी निवडणुकीच्या निकालावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाची स्वप्ने बघणाऱ्या मायावती यांच्या बसपाचा उत्तर प्रदेशात पार धुव्वा उडाला. मायावती यांची हक्काची मतपेढी भाजपकडे वळल्याने बसपाचा जनाधारच आटला. ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला एकही जागा तर मिळाली नाहीच पण मुस्लीमबहुल मतदारसंघांत फार प्रभावही पाडता आलेला नाही.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा विजय स्वीकारला आहे. जनतेच्या निर्णयाचा आदर करत ईव्हीएममध्ये हेराफेरीचे आरोपही त्यांनी फेटाळून लावले. मात्र, लोकांच्या मनातच एक विशेष चीप असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या पक्षाच्या खराब कामगिरीबद्दल निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही, असे ओवेसी म्हणाले आहेत.

“जनतेने भाजपला सत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. ज्यांनी आम्हाला मतदान केले त्या कार्यकर्त्यांचे, सदस्यांचे आणि राज्यातील जनतेचे मी आभार मानतो. आम्ही खूप प्रयत्न केले, पण आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. आम्ही पुन्हा मेहनत करू,” असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सपाद्वारे उपस्थित करण्यात येत असलेल्या ईव्हीएमचा मुद्दा फेटाळून लावला आहे. “सर्व राजकीय पक्ष आपला पराभव लपवण्यासाठी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करू इच्छितात. ईव्हीएममध्ये काही चूक नाही, लोकांच्या मनातच एक चीप आहे. आम्ही उद्यापासून पुन्हा काम सुरू करू आणि पुढच्या वेळी आणखी चांगले काम करू अशी आशा आहे,” असे ओवेसी म्हणाले.

भारताच्या लोकशाहीत बसपाची मोठी भूमिका

मायावतींबाबत विचारले असता ओवेसी यांनी बहुजन समाज पक्ष विसर्जित केल्यास लोकशाहीसाठी हा दु:खद दिवस असेल असे म्हटले आहे. भारताच्या लोकशाहीत बसपाचा मोठा वाटा आहे. पक्ष मजबूत होईल, अशी आशा आहे. आजचा निकाल नक्कीच  त्यांचा कमकुवतपणा दाखवतो, पण बसपाची गरज आहे, असेही ओवेसी म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All political parties trying to hide their defeat by raising evm issues says aimim chief asaduddin owaisi abn
First published on: 11-03-2022 at 09:14 IST