महाराष्ट्रातल्या २९ महानगरपालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी काही महानगरपालिकांमध्ये भाजपाला सहाकारी पक्ष किंवा प्रसंगी विरोधी पक्षातील काही गटांचा पाठिंबा घेण्याची तजवीज करावी लागली. तर दुसरीकडे राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या पक्षांना स्थानिक पातळीवर आपल्याच मित्रपक्षाविरोधात उभं राहण्याचा निर्णय घेण्याचे सर्वाधिकार स्थानिक नेत्यांवर देण्याची वेळ ओढवली. या पार्श्वभूमीवर एकीकडे सत्तास्थापनेबाबत जवळपास सर्वच महानगरपालिकांमध्ये राजकीय नाट्य रंगत असताना दुसरीकडे महापौरपदाची सोडत हादेखील चर्चेचा विषय ठरला होता. ही सोडत अखेर जाहीर झाली आहे. ज्यानंतर मुंबईचं सक्षम नेतृत्व करु शकेल अशी माता-भगिनीच मुंबईची महापौर होईल असं अमित साटम यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर सोडतीवरुन गोंधळ घालणाऱ्या विरोधकांनाही उत्तर दिलं आहे.
अमित साटम यांनी काय म्हटलं आहे?
“मुंबईचा विकास होत असताना, मुंबईची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी मुंबईचं नेतृत्व एक माता-भगिनी करणार आहे याचा आम्हाला अभिमान आहे. मातृशक्तीच्या नेतृत्वात मुंबई महापालिका भ्रष्टाचारमुक्त होणार, मुंबई शहर खड्डेमुक्त होणार, मुंबईची तुंबई होणार नाही. मुंबई शहराचा विकास देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजननुसार काम करण्यासाठी मातृशक्ती सज्ज होणार” असं भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं आहे.
मुंबईचं सक्षमपणे नेतृत्व करु शकेल अशी माता भगिनी महापौर होईल-अमित साटम
दोन-ते तीन दिवसांत भाजपा, शिवसेना नगरसेवकांची बैठक होईल. गटाची नोंदणी एकत्रितपणे करणार आहोत. सगळे पत्ते आत्ताच उघडणार नाही. या मुंबईचं सक्षमपणे नेतृत्व सक्षपणे करु शकेल अशी माता-भगिनीच महापौर म्हणून आम्ही मुंबईला देऊ असंही अमित साटम म्हणाले. तसंच आरक्षणावर आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं. त्यांनी नियम वाचलेले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाही. मुंबई महापालिकेत तीन पेक्षा जास्त नगरसेवक नाहीत त्यामुळे एसटीचं आरक्षण लागू शकत नाहीत. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी आधी अभ्यास करावा असंही अमित साटम म्हणाले. तसंच एससीचं आरक्षण हे मुंबईला आधी लागलं होतं त्यामुळे मुंबई त्यातून बाहेर आली असंही अमित साटम यांनी म्हटलं आहे. आरक्षणाची सोडत कशी निघते याचा अभ्यास केला पाहिजे प्रक्रियेचा अभ्यास करावा असंही अमित साटम यांनी म्हटलं आहे. गोंधळ घालायचा, फेक नरेटिव्ह पसरवायचं हेच मागची सात वर्षे गोंधळ घालणाऱ्यांनी केलं आहे.
