आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांना त्यांची बहीण वाय.एस.शर्मिला यांनी आव्हान दिले आहे. जगनमोहन हे वायएसआर काँग्रेसचे सर्वेसर्वा आहेत. तर शर्मिला या आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा असून, राज्यातील कडपा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.

आंध्र प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित होत आहेत. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगु देशम तसेच अभिनेते पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष आणि भाजप यांनी आव्हान दिलेय. त्याचबरोबर शर्मिला या राज्यात काँग्रेसचा जोरदार प्रचार करत आहेत.

* जगनमोहन राज्यभर प्रचार करत असून, सत्ताविरोधी लाटेचा त्यांना सामना करावा लागतोय.

हेही वाचा >>> पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

* शर्मिला यांनी निवडणुकीसाठी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात त्यांनी १३२ कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. मात्र यात भाऊ जगनमोहन व वहिनी भारती यांच्याकडून ८३ कोटींचे कर्ज दाखवले आहे.

* वडील वाय.एस.राजशेखर रेड्डी यांचा वारसा सांगण्याचा दोघांचाही प्रयत्न दिसतो. वाय.एस.आर.तेलंगण पक्ष स्थापन करून शर्मिला यांनी तेथील राजकारणात लक्ष घातले. मात्र त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. आता काँग्रेसने त्यांच्याकडे आंध्र प्रदेशची धुरा सोपवली. त्यामुळे या भावंडांमधील राजकीय संघर्ष वाढला. * आंध्रच्या विभाजनानंतर म्हणजेच २०१४ नंतर राज्यात काँग्रेसची स्थिती बिकट आहे. त्यामुळे शर्मिला या पक्षाला यश मिळवून देतील अशी त्या पक्षाच्या नेत्यांना आशा आहे. वायएसआर काँग्रेस शर्मिला यांच्यावर थेट टीका करत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.