‘अनुपमा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी बुधवारी (दि. १ मे) भाजपात प्रवेश केला. दिल्ली येथील भाजपा कार्यालयात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश झाल्यामुळे गांगुली प्रचारात उतरू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलत असताना रुपाली गांगुली म्हणाल्या, “विकासाचा महायज्ञ सुरू असताना त्यात सामील होण्याचा मी निर्णय घेतला आहे. मला यानिमित्ताने सर्व चाहत्यांचे आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा हवा आहे. मी योग्य तो निर्णय भविष्यात घेईल.”

यावर्षी मार्च महिन्यात अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

रुपाली गांगुली यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना म्हणाल्या, “विकासाच्या महायज्ञात सहभागी होण्याची माझी इच्छा होती. भारतीय नागरिक म्हणून आपल्या सर्वांना या यज्ञात सहभागी व्हायला हवे. महाकाल आणि माता रानी यांच्या आशीर्वादाने मी अनेक लोकांना भेटते, त्यांच्याशी संवाद साधत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनानंतर मी भाजपाच प्रवेश करत आहे. भाजपातील सर्व नेत्यांना एकदिवशी माझा अभिमान वाटेल, असे काम करून दाखवेल.”

पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणार?

पश्चिम बंगालमध्ये ४२ लोकसभा मतदारसंघासाठी सर्व सात टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या दोन टप्प्यात सहा मतदारसंघात मतदान झाले आहे. त्यानंतर उरलेल्या टप्प्यात अधिकाधिक मतदारसंघ आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने यावेळीस तृणमूल काँग्रेसला चांगलेच जेरीस आणलेले आहे. संदेशखाली लैंगिक अत्याचार प्रकरण, भ्रष्टाचार, इंडिया आघाडीतील फूट यावरून तृणमूल काँग्रेसवर भाजपाने टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्यावेळी बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते. यावेळी रुपाली गांगुली या प्रचार करणार का? याबाबत काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल.