गोवा विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाची चांगलीच चर्चा आहे. भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता आम आदमी पार्टीने मनोहर पर्रिकरांचे चिरंजीव उत्पल यांना जाहीर ऑफर दिली आहे. पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी जाहीरपणे त्यांना तिकीट देऊ केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबद्दल अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमध्ये केजरीवाल म्हणतात, गोव्यातल्या लोकांना फार वाईट वाटत असेल की भाजपाने आता आपलं यूज अँड थ्रो धोरण पर्रिकर परिवारासोबतही वापरलं आहे. मी मनोहर पर्रिकर यांचा कायम आदर केला. उत्पलजी आम आदमी पक्षात सामील होण्यास आणि आपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास तुमचं स्वागत असेल.

भाजपाने आज आपल्या गोव्यातल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र त्यात पक्षाने उत्त्पल पर्रिकर यांना उमेदवारी दिलेली नाही. त्याऐवजी पणजी मतदारसंघातून अटान्सिओ मॉन्सेरेट या नेत्याला तिकीट देण्यात आलं आहे. मॉन्सेरेट यांच्यावर २०१६ साली एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेनेही म्हटलं होतं की उत्पल पर्रिकर हे पात्र उमेदवार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, जर उत्पल पर्रिकर यांनी पणजी जागेसाठी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला तर मी भाजपा व्यतिरिक्त आम आदमी पार्टी, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी यांना आवाहन करतो की आपण त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा आणि त्यांच्याविरोधात आपला उमेदवार उभा करू नये. ही मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली ठरेल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwal tweets makes offer to manohar parrikars son vsk
First published on: 20-01-2022 at 16:33 IST