मुस्लिम आरक्षणासंदर्भात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर हिमंता बिस्वा सरमांवर जोरदा टीका केली आहे. लालूप्रसाद यादव यांना मुस्लिमांना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी खुशाल पाकिस्तानला जावं असं हिमंता बिस्वा सरमांनी म्हटलं आहे. लालूप्रसाद यादव यांनी काही दिवसांपूर्वी असं म्हटलं होतं की जर आम्ही निवडून आलो तर संपूर्ण देशातल्या मुस्लिमांना आरक्षण देऊ. त्याबाबत हिमंता बिस्वा सरमांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानात त्यांनी जावं आणि तिथे धर्माच्या आधारावर मुस्लिमांना आरक्षण द्यावं कारण भारतात हे शक्य नाही असं हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे.

पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणार

आम्ही पाकव्याप्त काश्मीरचा भाग भारताशी जोडणार आहोत असंही हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे. तसंच आसाम सरकारने ७०० मदरसे बंद केले आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच आम्ही अयोध्येपाठोपाठ आता मथुरेत मंदिर उभारणार आहोत. तसंच पाकव्याप्त काश्मीर हे भारताशी जोडणार आहोत. मोदी सत्तेत आल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल असंही हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटलं आहे.

सम्राट चौधरींचीही टीका

याआधी बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार टीका केली. लालूप्रसाद यादव हे मुस्लिमांची वकिली करत आहेत असं सम्राट चौधरींनी म्हटलं आहे. कुठल्याही परिस्थितीत मुस्लिमांना विशेष आरक्षण दिलं जाणार नाही. अति मागासवर्ग, दलित समाज आणि मागास समाज, तसंच गरिब सवर्णांचं आरक्षण आम्ही कुठल्या परिस्थितीत संपवणार नाही असंही सम्राट चौधरींनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- दोन मुली निवडणूक रिंगणात, पण चर्चा लालू प्रसाद यादवांना ‘किडनी देनेवाली बेटी’ चीच!

लालू प्रसाद यादव काय म्हणाले होते?

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार करताना लालूप्रसाद यादव यांनी भाजपावर टीका केली होती. भाजपाकडून जंगलराज राबवलं जातं आहे. भाजपाकडून दहशत पसरवली जाते आहे. तसंच लोकांना भडकवलं जातं आहे. या लोकांना देशाचं संविधान संपवायचं आहे त्यामुळे आमची सत्ता आल्यानंतर आम्ही मुस्लिमांना आरक्षण देऊ असं वक्तव्य लालूप्रसाद यादव यांनी केलं होतं. त्यानंतर आता भाजपाने लालूप्रसाद यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.