Kirit Somaiya Letter to Danve: गेल्या दोन दिवसांपासून भाजपाचे मुंबईतील नेते व माजी खासदार किरीट सोमय्या चर्चेत आहेत. भारतीय जनता पक्षाकडून किरीट सोमय्यांना आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रचार समिती सदस्यपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण सोमय्यांनी थेट नाराजी व्यक्त करत ही जबाबदारी नाकारली होती. तसेच, पक्षाकडून अशी अवमानास्पद वागणूक पुन्हा देऊ नये, असंही त्यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केलं. त्यावरून बरीच चर्चा झाल्यानंतर आता तो विषय संपल्याचं स्पष्टीकरण किरीट सोमय्यांनी दिलं आहे.

नेमकं काय घडलं?

किरीट सोमय्यांनी रावसाहेब दानवेंना लिहिलेल्या पत्रात आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच, याबाबत त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केली होती. “पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीच्या सदस्यपदी माझी नियुक्ती केल्याबद्दल मी महाराष्ट्र भाजपाचे आभार मानतो. मात्र मी हे पद स्वीकारण्यास असमर्थ आहे, त्याबद्दल खेद व्यक्त करतो. मी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगितलं आहे की गेल्या साडेपाच वर्षांपासून मी भाजपाचा सामान्य सदस्य म्हणून काम करत आहे. तेच काम यापुढेही चालू ठेवेन. मात्र, मी प्रचार समितीत सहभागी होणार नाही”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या पोस्टवरून राजकीय तर्क-वितर्क सुरू झाल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याबाबत प्रतिक्रिया दिली. “माजी खासदार किरीट सोमय्या हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र, पक्षाचे नेतृत्व हे कोणाला विचारून एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही, याबाबत तसा नियमही आहे. आता कोणाला आमदारकी द्यायची असेल तर पक्ष विचारत नाही. किंवा एखादी जबाबदारी द्यायची असेल तर विचारून देत नाही. मला प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात आली, मलाही पक्षाने विचारलं नाही, तुम्ही काम करा सांगितलं. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. ते ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील”, असं बावनकुळेंनी स्पष्टपणे सांगितलं.

किरीट सोमय्यांचं स्पष्टीकरण

चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची स्पष्ट भूमिका माध्यमांकडे मांडल्यानंतर २४ तासांच्या आत किरीट सोमय्यांनी आपल्या पत्राबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. “या विषयाच्या मार्केटिंगसाठी त्याला लेटर बॉम्ब म्हटलं जातंय. भारतीय जनता पक्षात अंतर्गत लोकशाही आहे. चर्चा होत असते. हा त्याचाच एक भाग आहे. पक्षात जर वेगळी मतं नसली तर तुम्ही म्हणता हुकुमशाही, एकाधिकारशीह. कुणी बोलू शकत नाही. इथे पक्षात जर दोन व्यक्तींमध्ये एका विषयावर वेगवेगळी मतं आली तर त्याला आपण लेटरबॉम्ब नाव ठेवतो. त्यामुळे मी चर्चेत आहे. हा भाग अंतर्गत चर्चेचा होता. तो विषय आता संपला आहे”, असं किरीट सोमय्यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितलं.

Chandrashekhar Bawankule : किरीट सोमय्यांनी पक्षाचा आदेश धुडकावल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “दिलेली जबाबदारी…”

“मी पक्षाची कामं करत राहणार”

दरम्यान, आपण पक्षाची इतर कामं करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. “चंद्रशेखर बावनकुळेंशी चर्चेची आता गरजच नाहीये. मी म्हटलं इतर १० कामं मी करतोय, ती करत राहणार. त्याचा काही प्रश्नच नाहीये. कदाचित त्यांच्या मनात भ्रम झाला असेल की किरीटला काहीतरी पद द्यावं लागेल, स्टेटस द्यावा लागेल म्हणून त्यांनी हे केलं असेल. पण ते गरजेचं नाही. दुसऱ्या कुणालातरी काम दिलंय तर त्यांना मी मदत करणारच आहे”, असंही किरीट सोमय्यांनी यावेळी नमूद केलं.