बीड लोकसभा मतदारसंघामधून भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात सामना होणार आहे. पंकजा मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली. “आज सकाळपासूनच मी थोडी गंभीर आहे, मला माझी भावना शब्दामध्ये सांगता येणार नाही”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला. आता लोकांकडून आशीर्वाद घ्यायचे आहेत. आमचे नेतृत्व लोकांनी अनेकवर्ष पाहिले आहे. माझे नेतेही सर्वांना माहिती आहेत. त्यामुळे लोकांनी योग्य प्रवाहात उडी घ्यावी म्हणजे जिल्ह्याचा विकास योग्य ठिकाणी जाईल असे वाटते”, असे त्या यावेळी म्हणाल्या.

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : अमरावतीतून राहुल गांधींची महिलांसाठी मोठी घोषणा, दरवर्षाला मिळणार लाख रुपये; योजनेविषयी म्हणाले, “गरिबांची यादी…”

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “आज सकाळपासून मी थोडी गंभीर आहे. मला शब्दामध्ये माझी भावना सांगता येणार नाही. कारण गोपीनाथ मुंडे हा अर्ज नेहमी भरत होते. मी त्यांच्याबरोबर असायचे. प्रचाराची जबाबदारी माझ्याकडे असायची. प्रीतम मुंडे यांच्यावेळीही प्रचारात मी मुख्य असायचे. आता स्वत:साठी अर्ज भरायचा हा एक वेगळा अनुभव आहे. आज मला अनेकांनी विचारले तुम्ही नेहमी सारख्या फ्रेश दिसत नाही. मला हे शब्दात वर्णन करता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या दुसरा टप्प्यातील प्रचारासाठी २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून नेत्यांच्या प्रचारतोफा आज थंडवणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध ठिकाणी राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा पार पडल्या आहेत.