scorecardresearch

लवकरच बस हवेत उडताना दिसणार; नितीन गडकरींची घोषणा; म्हणाले, “माझ्याकडे पैशांची कमी नाही, करोडोंमध्ये…”

हवाई बसचा डीपीआर तयार; नितीन गडकरींकडून आश्वासनांचा पाऊस

BJP, Nitin Gadkari, Nitin Gadkari promises flying buses, Prayagraj, Uttar Pradesh Assembly Election,
हवाई बसचा डीपीआर तयार; नितीन गडकरींकडून आश्वासनांचा पाऊस

ज्येष्ठ भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच हवेत उडणाऱ्या बस पहायला मिळतील अशी घोषणा केली आहे. इतकंच नाही तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नितीन गडकरी यांनी प्रयागराजमधील सभेला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी हे आश्वासन दिलं. ग़डकरींनी यावेळी बोलताना सी प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक आश्वासनं दिली.

“माझ्याकडे आता रोपवे, केबल कार आली आहे. आता मी केशवजींना सांगितलं आहे की, हवेत चालणाऱ्या बसचाही डीपीआर तयार करत आहोत. प्रयागराजमध्ये रस्त्याच्या वर हवेत चालणारी बस चालवू. तुम्ही रस्ता तयार करुन घ्या. माझ्या विभागाकडे पैसा आहे. माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही. मी करोडोंमध्येच चर्चा करतो,” असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले. नितीन गडकरी यांनी यावेळी यासंबंधीच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार केला जात असून उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना माहिती देण्यात आल्याचं सांगितलं.

Viral Video: रस्त्यावर ड्राईव्ह करत असताना अचानक उडू लागली कार, खोटं वाटत असेल तर तुम्हीच बघा

“प्रयागराजमध्ये सी प्लेन सेवा सुरु करण्याचं आपलं स्वप्न आहे, ज्यामुळे मी दिल्लीवरुन उड्डाण करुन संगमच्या पाण्यातून प्रयागराजमध्ये लँण्डिंग करुन शकतो. लवकरच हेदेखील सत्यात उतरणार आहे,” असंही गडकरी यावेळी म्हणाले.

नितीन गडकरींनी यावेळी हायड्रोजन इंधनाचा वापर वाहनांमध्ये केला जाईल असं सांगितलं. राज्यात मुबलक ऊस उपलब्ध होता, त्याच्या सहाय्याने इथेनॉलचा वापर वाहनातील इंधन म्हणून केला जाईल. इथेनॉलच्या वापरामुळे वाहनासाठी लागणाऱ्या इंधनाची किंमत कमी होऊन १०० रुपये लीटर पेट्रोलच्या तुलनेत ६८ वर येईल असा दावा गडकरींनी केला.

नितीन गडकरी यांनी यावेळी आपण नेहमी आश्वासनं पूर्ण करतो आणि यावेळीदेखील काही वेगळं नसेल असा शब्द दिला. नितीन गडकरी यांनी यावेळी विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार आणण्याचं आवाहन केलं. उत्तर प्रदेशचं नशीब बदलण्यासाठी भाजपाचं सरकार गरजेचं आहे असं गडकरी म्हणाले. या सरकारमुळे गुंडाराज संपला असून कायदा-सुव्यवस्था आली असल्याचंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व निवडणूक २०२३ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-02-2022 at 08:26 IST
ताज्या बातम्या