“महाराष्ट्रात ज्या प्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही”

फडणवीसांचा राष्ट्रवादीवर निशाणा ; “त्यांनी जरूर प्रयोग करावा पण त्यांना गोव्यात आम्ही संधीच देणार नाही” असंही म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रात ज्या प्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही”
(संग्रहित प्रातिनिधिक छायाचित्र)

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, गोव्यासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. गोव्याचे भाजपा प्रभारी व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात भाजपाचे पुन्हा सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. शिवाय, उत्तर प्रदेशमध्येही भाजपाला स्पष्ट बहुमत दिसत असल्याचही फडणवीसांनी म्हटलं आहे. याचबरोबर फडणवीसांनी या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजच्या पत्रकारपरिषदेतील विधानांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“मला अतिशय आनंद आहे की आज गोविंद गावडे जे अपक्ष म्हणून निवडून आले होते व नंतर पाच वर्ष सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या मतदार संघात कमळ फुलणार याबद्दल कुठलीही शंका नाही. एकूणच बघितलं तर सर्वे असेल किंवा ग्राउंड रिअलिटी असेल भाजपाचं सरकार हे गोव्यात पुन्हा स्थापित होणार, या बद्दल आता फारशी शंका कुणाच्या मनात उरली नाही. आम्ही जनतेमध्ये चाललो आहोत, आमच्या रचना लावतो आहोत, केलेली कामे सांगत आहोत आणि त्या आधारवर आम्ही मत मागत आहोत.” असं देवेंद्र फडणवीस एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलताना म्हणाले आहेत.

गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये १०० टक्के परिवर्तन होतंय हे लिहून ठेवा – संजय राऊत

तसेच, शरद पवारांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं की लाट आता ओसरत आहे आणि सर्वेमध्ये भाजपाच्या जागा देखील उत्तर प्रदेशात कमी होताना दिसत आहेत. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “पहिली गोष्ट अशी आहे की, सर्वेमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपा स्पष्ट बहुमत दिसत आहे. मी त्याच्या पलिकडे जाऊन सांगेन, की उत्तर प्रदेशमधली जी काही हवा मला पाहायला मिळत आहे, ती मागच्या वेळेस पेक्षाही आम्ही पुढे जाऊ अशा प्रकारची हवा त्या ठिकाणी दिसत आहे. आता शरद पवार असतली किंवा कोणीही मोठे नेते असतील, यांची अडचण अशी आहे की यांच्या कुठल्याही विरोधी पक्षाचं अस्तित्वच दिसत नाही. ते कुठेच दिसत नाही, त्यामुळे भाजपाचे आणखी कमी होताय यामध्ये आनंद मानायचा, एवढ्या पुरता त्यांचा आनंद आहे पण तो ही त्यांना काही फार साजरा करता येईल, असं मला दिसत नाही.”

पण त्यांना गोव्यात आम्ही संधीच देणार नाही –

गोव्यात राष्ट्रवादीची तृणमूल किंवा काँग्रेससोबत बोलणी सुरू असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “ त्यांनी जरूर प्रयोग करावा पण त्यांना गोव्यात आम्ही संधीच देणार नाही. स्पष्ट बहुमत गोव्याची जनता, ही भाजपाला देईल आणि ज्या प्रकारे जनमताची चोरी तीन पक्षांनी महाराष्ट्रात केली, ती चोरी गोव्यात आम्ही होऊ देणार नाही.” असं फडणवीसांनी बोलून दाखवलं.

कोणाच्या जाण्याने या पक्षाला फार फरक पडेल असं नाही –

याचबरोबर भाजपा मंत्री मायकल लोबो व आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी दिली त्याबद्दल बोलाताना फडणवीसांनी सांगितले की, “जे बाहेर गेले हे स्पष्टच आहे की ते त्यांच्या स्वार्थासाठी बाहेर गेले. आता ते तत्वाच्या गोष्टी सांगत आहेत, परंतु भाजपाकडून त्यांना जे काही मिळालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता भाजपामध्ये आपल्या पत्नील तिकीट मिळत नाही आणि काँग्रेस दोन तिकीट आपल्याला देतेय या गोष्टीसाठी त्यांनी पक्ष बदलला आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण मला असं वाटतं की भाजपा फार मोठी आहे, कोणाच्या जाण्याने या पक्षाला फार फरक पडेल असं नाही. त्या उलट येणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे भाजपा चांगल्या फरकराने सरकार तयार करेल. नाराजांची मनधरणी करणं, सगळ्यांना सोबत घेणं आणि एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाणं हे माझं या ठिकाणी कामच आहे आणि ते आम्ही करू.”

राष्ट्रवादी काँग्रेस आगामी ५ पैकी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार, कुठे किती जागा? वाचा शरद पवार काय म्हणाले…

“गोव्यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिलीय. पुढील २ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल,” असं शरद पवार यांनी आज पत्रकारपरिषदेत सांगितलं आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp to form government again in goa fadnavis msr

Next Story
उत्तर प्रदेशमध्ये कॅबिनेट मंत्र्याचा भाजपाला धक्का देत सपात प्रवेश, शरद पवार म्हणाले, “इतकंच नाही, तर सोबत १३ आमदार…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी