केंद्रीय निवडणूक आयोगाने देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मात्र, यामध्ये सर्वाधिक चर्चा ही उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांची होत आहे. या राज्याचं राजकीय महत्त्व हे त्यामागचं एक कारण असलं, तरी इथे घडणाऱ्या अजब घटनांमुळे देखील उत्तर प्रदेशची निवडणूक चर्चेत आली आहे. एकीकडे भाजपाचे एक उमेदवार प्रचार करण्यासाठी थेट आंघोळ करणाऱ्या माणसासमोर जाऊन उभे ठाकले, तर दुसरीकडे आता बसपाच्या एका इच्छुक उमेदवारानं तिकीट मिळालं नाही, म्हणून थेट पोलीस स्थानक गाठत ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली. वर आत्महत्येची धमकी देखील दिली!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमेदवारीचं आश्वासन आणि ६७ लाख रुपये!

हा सगळा प्रकार घडलाय उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये. इथल्या चरथावल विधानसभा मतदारसंघाचे बसपा प्रभारी अरशद राणा यांनी आपल्याच पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांविरोधा थेट पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. २०२२च्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी देण्याचं आश्वासन पक्षाकडून देण्यात आलं होतं. त्यासाठी पक्षाचे उत्तर प्रदेश प्रभारी शमशुद्दीन राईन यांना आपण थोडे-थोडे करून ६७ लाख रुपये दिले आहेत. मात्र, तरी देखील उमेदवारी दुसऱ्याला देण्याचा निर्णय घेतल्याचा दावा अरशद राणा यांनी केला आहे.

“….यांनी माझा तमाशा बनवून ठेवलाय!”

पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे अखेर अरशद राणा पोलीस स्थानकात गेले. तिथे तक्रार देत असताना ते चक्क ढसाढसा रडायलाच लागले! “यांनी माझा तमाशा बनवून ठेवलाय. मी कधीच असा काही विचार केला नव्हता. मला आत बसवून मला सांगतायत की तुमच्या जागी दुसऱ्या कुणालातरी निवडणुकीला उभं करत आहोत”, असा आरोप राणा यांनी केला. हे सांगतानाही राणा रडतच असल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

“…तरी हे माझ्यासोबत असं करतायत”

“तुम्ही पाहिलं असेल की इथे किंवा दिल्लीमध्ये सगळे होर्डिंग्ज आणि फ्लेक्स मीच लावतोय. हे सगळं मी करतोय, पण तरी हे माझ्यासोबत असं करत आहेत”, असं राणा म्हणाले.

आत्महत्येचा दिला इशारा!

दरम्यान, राणा यांनी चक्क आत्महत्या करण्याची देखील धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. “जर मला न्याय मिळाला नाही, तर लखनौमधील बसपा कार्यालयात जाऊन मी आत्महत्या करेन”, असं राणा म्हणाल्याचं वृत्त झी न्यूजनं दिलं आहे.

दरम्यान, शुक्रवारी उत्तर प्रदेशमधील भाजपा उमेदवाराचा देखील एक व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भाजपा आमदार सुरेंद्र मैथियानी हे चक्क एका मतदाराच्या घरात जाऊन पोहोचले. आंघोळ करतानाच एका व्यक्तीला “सगळं ठीक आहे ना? घर बांधून झालं ना तुमचं? तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का?” अशी विचारणा करताना दिसत आहेत.

Video : अजब प्रचार! आंघोळ करणाऱ्या माणसालाही सोडलं नाही; भाजपा आमदाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

उत्तर प्रदेशमध्ये येत्या १० फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार असून ७ मार्च रोजी शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bsp arshad rana virao video crying for ticket uttar pradesh election 2022 pmw
First published on: 14-01-2022 at 16:19 IST