लोकसभा निवडणूक १ जूनला पार पडली आहे. कारण लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा त्यादिवशी संपला आहे. अशात जे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले त्यात भाजपाला ३५० किंवा त्याहून अधिक जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे काँग्रेसने इंडिया आघाडीसह २९५ जागा मिळतील असं म्हटलं आहे. ४ जून उजाडण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. अशात निकालासाठी जोरदार तयारी भाजपा कार्यकर्त्यांकडून सुरु आहे.

पाटण्यात मोदींचे मास्क घालून तयार करण्यात येत आहेत लाडू

बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात भाजपाचे समर्थक एकदम जोशात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मास्क घालून लाडू वळण्याचं काम सुरु आहे. हे लाडू लोकसभेचा निकाल लागल्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते लोकांना वाटणार आहेत.

हे पण वाचा- अमरावतीत झळकले नवनीत राणा यांच्‍या विजयाचे फलक!

मुंबईत तयार होते मिठाई, मंदिर आणि मशिदीची सजावट

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत मिठाई मोठ्या प्रमाणावर तयार होते आहे. मुंबईतल्या गणेश भांडारात लाडू तयार करण्याचं काम जोरात सुरु आहे. काही मिठाई दुकानांनी कमळच्या छापाची मिठाईही तयार करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर ते फोटो व्हायरल होत आहेत. काही मंदिरांमध्ये आणि मशिदींमध्ये रोषणाई करण्यात आली आहे आणि मोदींच्या विजयासाठी प्रार्थना केली जाते आहे.

काही भागांमध्ये कमळाच्या आकाराची मिठाई तयार केली जाते आहे.

जबलपूरमध्ये वाटण्यात येत आहे मिठाई

मध्य प्रदेशातल्या जबलपूरमध्ये लोकसभा निवडणूक निकाल लागण्याधीच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटप सुरु केलं आहे. उत्तर मध्य विधानसभेचे आमदार अभिलाष पांडे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह बुंदीचे लाडू तयार करत आहेत. हे बुंदीचे लाडू निवडणूक निकालानंतर लोकांमध्ये वाटण्यात येणार आहेत. जबलपूरच्या काही भागांमध्ये आत्तापासूनच मिठाई वाटली जाते आहे. लड्डू आणि कलाकंद या दोन मिठायांना मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे सरबतंही मोठ्या प्रमाणावर केली जात आहेत.

वाराणसीत रुद्राभिषेक

वाराणसीत एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर उत्साहाचं वातावरण आहे. काशीमध्ये भाजपा आणि एनडीएला ४०० जागा मिळाव्यात म्हणून रुद्राभिषेक यज्ञ केला जातो आहे. महामृत्यूंजय मंदिरातही यज्ञ करण्यात येतो आहे.

लोकसभा निवडणूक निकाल लागण्यासाठी आता काही तास उरले आहेत. अशात भाजपाचे मतदार आणि कार्यकर्ते यांच्यात अशा पद्धतीने उत्साहाचं वातावरण दिसून येतं आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. काही ठिकाणी काँग्रेसही विजयाची तयारी करतं आहे असं दिसून येतं आहे.

कोलकाता येथे इंडिया आघाडीच्या समर्थकांकडून मिठाईची तयारी

कोलकाता येथे इंडिया आघाडीच्या समर्थकांकडून लाडू तयार केले जात आहेत. इंडिया आघाडीचे पक्ष म्हणजेच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्ष यांच्या पक्ष चिन्हांच्या आकाराच्या मिठाया तयार केल्या जात आहेत. काही दुकानदार फुलांच्या माळाही मोठ्या प्रमाणावर तयार करत आहेत. दिल्लीतल्या २४ अकबर रोड या ठिकाणी काँग्रेस समर्थक इंडिया आघाडीच्या विजयाची मिठाई वाटत आहेत. त्यासंदर्भातला एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. काही जण राहुल गांधींच्या प्रतिमेवर फुलं उधळत आहेत असंही दिसून येतं आहे.