देशात सध्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं आहे. प्रामुख्याने उत्तर प्रदेश व गोवा येथील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. या दोन्ही ठिकाणी सत्ताधारी असलेल्या भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिवाय, फोडाफोडीच्या राजकारणालाही वेग आलेला आहे. दरम्यान, सर्वच पक्षांकडून आता उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता भाजपाकडून ही पहिली यादी यादी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार यांची सर्वांनाच उत्सुकता होती. शिवाय, योगी हे यंदा अयोध्या किंवा मथुरा मधून निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा देखील सुरू होती. अखेर ही चर्चा आज थांबली आहे. कारण, भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री योगींचा मतदारसंघही निश्चत झालेला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीनुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, मथुरा मतदारसंघातून भाजपाने विद्यमान ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांना तिकीट दिले आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजच्या सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

यादी जाहीर करताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, १०७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ६३ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. २१ नवीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले असून यामध्ये तरुण, महिला आणि समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून लढले तर संपूर्ण राज्यात हिंदुत्वाचा संदेश जाईल, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे होते. तर, भाजपा खासदार हरनाथ यादव यांनीही पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून मुख्यमंत्री योगी यांना मथुरेतून निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. माझ्या स्वप्नात भगवान कृष्ण आले होते आणि म्हणाले होते की, मथुरेतून मुख्यमंत्री योगींना लढायला सांगा, असे हरनाथ यादव यांनी म्हटले होते.

तसेच, “गोरखपूरच्या जागेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत चर्चा केली होती. पण धार्मिक दृष्टिकोनातून अयोध्येला अधिक महत्त्व आहे. योगी अयोध्येतून लढले तर भाजपाने आपली राजकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मूलभूत तत्त्वांशी तडजोड केलेली नाही, असा संदेश जाईल.” असेही भाजपाच्या एका नेत्याने सांगितले होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister yogi adityanath will contest from gorakhpur assembly constituency msr
First published on: 15-01-2022 at 13:47 IST