Eknath Shinde on Haryana Assembly Election 2024 Result : हरियाणात भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह भाजपा हरियाणात तिसऱ्यांचा सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, भाजपाच्या या विजयानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देत हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुतीचं सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

एकनाथ शिंदे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत या निकालाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत जातीवाद हरला आणि विकास जिंकला. डबल इंजिन सरकारची विजयी घौडदौड कायम आहे. हरियाणातील जनतेने सलग तिसऱ्यांदा डबल इंजिन सरकारवर विश्वास दाखवला आहे. या विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे अभिनंदन करतो. तिघांच्याही अथक प्रयत्नांमुळे आज विरोधकांच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Haryana Assembly Election Result 2024 Live : हरियाणातील सत्ता तिसऱ्यांदा भाजपाच्या हाती, काँग्रेसला धोबीपछाड

हरियाणातील जनतेचं मनापासून अभिनंदन करतो, कारण…

पुढे बोलताना त्यांनी हरियाणातील जनतेचेही अभिनंदन केलं. हरियाणातील जनतेने काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला महत्त्व न देता भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मी हरियाणातील जनतेचीही मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्रातील जनताही खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीबाबतही भाष्य केलं. हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातील जनताही काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही. डबल इंजिन सरकारद्वारे सुरू असलेला विकासाचा प्रवास महाराष्ट्रातही सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जे हरियाणात घडले तेच महाराष्ट्रात घडेल – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. या हॅट्रिक विजयासाठी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. लोकसभा निवडणुकीत आपल्याला फेक नॅरेटिव्हमुळे कमी मते मिळाली. तेव्हापासून फेक नॅरेटिव्हला, थेट नॅरेटिव्हने उत्तर द्यायचे ठरवले. परिणामी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला आहे. जे हरियाणात घडले तेच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल. हरियाणात यावेळी विजयाचे सर्व रेकॉर्ड तोडत आपण थेट ४८ जागा जिंकलेल्या आहेत. तसेच, गेल्या ६० वर्षात प्रथमच सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणारा भाजपा हा एकमेव पक्ष ठरला आहे. हा विजय भाजपा कार्यकर्त्यांचा आत्माविश्वास वाढवणारा आणि मुर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – Haryana Vidhan Sabha Election 2024 : हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा निकाल…”

हरियाणात भाजपाला ४८ तर काँग्रेसला ३७ जागांवर विजय

दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला असून काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपाने ४८ तर काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय भारतीय लोकदल पक्षाने २ तर अपक्षांना ३ जागांवर विजय मिळाला आहे. या विजयासह भाजपा आता तिसऱ्यांदा हरियाणात सरकार स्थापन करणार आहे.