काँग्रेसचे प्रवक्ते आणि वरिष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मथुरेच्या भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यासंदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यानंतर भाजपाने रणदीप सुरजेवालांवर जोरदार टीका केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? रणदीप सुरजेवाला १ एप्रिलला हरियाणातल्या कुरुक्षेत्र या ठिकाणी असलेल्या एका गावात प्रचारासाठी गेले होते. सुशील गुप्ता यांच्या समर्थनार्थ त्यांनी सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. "आपण लोकांना खासदार, आमदार म्हणून का निवडून देतो? तर ते आपलं म्हणणं मांडू शकतील. हेमा मालिनी यांच्यासारखं…####" असं म्हणत त्यांनी हेमा मालिनी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. कंगना रणौत आक्रमक कंगनाने रणदीप सुरजेवाला यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. तुमचे नेते तर मोहब्बत की दुकान उघडणार म्हणत होते. आता तुम्ही द्वेष आणि तिरस्काराचं दुकान उघडलं आहे. महिलांबाबत काँग्रेस किती खालच्या पातळीचा विचार करतं हेच तुम्ही दाखवून देत आहात. तुमचा पराभव तुम्हाला दिसतो आहे त्यामुळे तुमचं चारित्र्य कसं आहे ते रोज दाखवून देत आहात. या आशयाची पोस्ट कंगनाने केली आहे. हे पण वाचा- “देशात लोकशाहीची हत्या”, राहुल गांधींच्या टीकेवर कंगनाचं चोख प्रत्युत्तर; म्हणाली, “कदाचित त्यांना…” अमित मालवीय यांनीही घेतला समाचार भाजपाचे आयटी सेलचे प्रमुख यांनीही रणदीप सुरजेवालांवर टीका केली आहे. हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांनी केलेलं वक्तव्य घृणास्पद आहे. फक्त हेमा मालिनी यांचाच नाही तर त्यांनी सगळ्याच महिलांचा अपमान केला आहे असं मालवीय यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी कंगनावर टीका करण्यात आली होती. आता हेमा मालिनी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष हाच आहे जो स्त्रीद्वेषी आणि महिलांचा तिरस्कार करणारा आहे.