लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. उर्वरित पाच टप्प्यांची निवडणूक बाकी आहे. ४ जून या दिवशी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राजकीय पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी सुरुच आहेत. नरेंद्र मोदी रेकॉर्डब्रेक सभा घेत आहेत. काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून घेईल असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता. आता त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“काँग्रेसचा इतिहास तपासून बघा, १९९० पासून ही मागणी जोर धरते आहे की देशात समाजाचा एक मोठा वर्ग आहे ज्या वर्गाला आपल्यासाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे हे वाटतं. त्यासाठी आंदोलनंही झाली. १९९० पूर्वी काँग्रेसने विरोध केला आणि हा प्रश्न दडपला होता. मात्र त्यांनी नंतर जे आयोग आणले, समित्या स्थापल्या त्यांचे अहवालही ओबीसींच्या बाजूने येऊ लागले. ९० च्या दशकानंतर मतपेटीच्या राजकारणामुळे काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना वाटू लागलं.”

काँग्रेसचं पहिलं पाप काय?

“त्यांनी (काँग्रेस) केलं पहिलं पाप काय होतं? ९० च्या दशकात त्यांनी कर्नाटकात मुस्लिमांना ओबीसी म्हणून वर्गीकृत करण्याचा निर्णय घेतला. राजकीय हित साधण्यासाठी मुस्लिमांना ओबीसी हे लेबल लावलं गेलं. काँग्रेसची केंद्रातून त्यानंतर हकालपट्टी झाली. २००४ पर्यंत ही योजना रखडली. २००४ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेशातील मुस्लिमांना ओबीसी कोटा देण्याचा निर्णय घेतला. न्यायालयात हे प्रकरण गुंतागुंतीचंझालं. भारतीय संविधानाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिलं आहे.”

हे पण वाचा- मोदींमुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची चीनचीही हिंमत नाही, देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मनमोहन सिंग यांच्या वक्तव्यामुळे बराच गदारोळ झाला होता

“२००६ मध्ये राष्ट्रीय विकास परिषदेची बैठक झाली. त्या बैठकीत मनमोहन सिंग यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ झाला होता. त्यानंतर ते दोन वर्षे शांत राहिले. २००९ च्या घोषणापत्रात याचा पुन्हा उल्लेख झाला. २०११ मध्ये याबाबतची एक कॅबिनेट नोट आहे. जिथे त्यांनी मुस्लिमांना ओबीसीत वाटा देण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशच्या त्यावेळच्या निवडणुकीतही त्यांनी हा प्रचार केला पण उपयोग झाला नाही. २०१२ मध्ये आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयानेही ते रद्द केलं. त्यानंतर काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेला तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. पंडित नेहरु, बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत देशाचं संविधान तयार झालं आहे. भारताची घटना लिहिण्यात आली तेव्हा संघ किंवा भाजपाचे लोक उपस्थित नव्हते. दीर्घ चिंतन केल्यानंतर भारतासारख्या देशात धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला.” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. न्यूज १८ लोकमतला नरेंद्र मोदींनी मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याविषयी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे सविस्तर उत्तर दिलं आहे. इतकंच नाही तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप आहे असंही म्हटलं आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप

“२०२४ चा काँग्रेसचा जाहीरनामा बघा. त्यावर मुस्लिम लीगची छाप आहे हे दिसून येतं आहे. काँग्रेसने संविधानाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे एससी आणि एसटी यांच्या आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. मी देशातल्या लोकांना याची माहिती का देऊ नये?” असा प्रश्नही मोदींनी विचारला आहे.