महाराष्ट्रातल्या २९ पैकी २४ महापालिकांमध्ये भाजपा-महायुतीची सरशी झाली आहे. दरम्यान काही महापालिकांमध्ये भाजपाला यश मिळालेलं नाही. अशीच एक महापालिका म्हणजे चंद्रपूर महापालिका. ३० जागा जिंकून चंद्रपूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला. पण काँग्रेसला मॅजिक फिगर गाठता आली नाही. काँग्रेसला आणखी ४ नगरसेवकांची गरज आहे. दरम्यान काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण, विजय वडेट्टीवर यांनी चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेसच्याच नवनिर्वाचित नगरसेवकांचे जबरदस्तीने उचलून नेले असा गंभीर आरोप प्रतिभा धनोरकर यांनी केला आहे.

प्रतिभा धानोरकर यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

आमच्याच काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने आमचे नगरसेवक घरी असताना त्यांना उचलून नेलं. पक्षाच्या नगरसेवकांना उचलून नेऊन वेगळे गट करायची गरज नव्हती. विजय वडेट्टीवार यांनी हे का केलं मला माहीत नाही. विजय वडेट्टीवार काँग्रेसचे आहेत, मी देखील काँग्रेसची आहे पण विजय वडेट्टीवार महाराष्ट्राचे नेते आहेत, त्यांचं काम मोठं आहे. त्यांनी महाराष्ट्रात लक्ष द्यायला हवं. फक्त माझ्या मतदारसंघात ते लक्ष का घालत आहेत? त्यांनी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष द्यायला हवं होतं असं प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी नगरसेवकांना उचलून नेलं-धानोरकर

विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसचे ३० नगरसेवक निवडून आल्यानंतर सत्ता सत्ता स्थापनेचा प्रयत्न करायचा होता. मात्र, त्यांनी नगरसेवकांना घरातून उचलून गटबाजी सुरु केलीय, असे करायला नको होते. त्यामुळे उर्वरित नगरसेवक सुरक्षित राहावे, यासाठी आम्ही त्यांना हॉटेलला हलवले आहे, अशी माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसची गटबाजी समोर आली आहे. चंद्रपूर हा माझा लोकसभा मतदार संघ आहे, त्यांनी माझ्या मतदारसंघात ढवळाढवळ करू नये ही आमची मागणी आहे. नाहीतर उद्याला आम्ही त्यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघात ढवळाढवळ करू, असा इशारा प्रतिभा धानोरकर यांनी दिला. तसेच, आमची मागणी पक्षाने मान्य केली नाही, पक्षाला आमची गरज नसेल तर मग आम्ही सामूहिक राजीनामा देऊ, अशी परखड भूमिकाही प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे. प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या या आरोपांमुळे चंद्रपूर काँग्रेसमध्ये वाद चव्हाट्यावर आले आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांनी काय म्हटलं होतं?

“काँग्रेसच्या नगरसेवकांच्या एका गटाला देखील असं वाटतं की शहरातील जनतेला आपण काय उत्तरं द्यायची? उद्या शहरांत विकासच झाला नाही, या शहरातील स्वच्छतेचे विषय आहेत, वीजेच्या संदर्भातील विषय आहेत. या शहरात उद्या जर कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाच पैसे राहिले नाहीत, तर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून आपल्याला जनतेने आपल्याला कशासाठी निवडून दिलं? ज्या पद्धतीने या शहरात जनतेचा आमच्यावर विकासाबाबत विश्वास आहे, त्यामुळे काँग्रेसच्या काही नगरसेवकांची देखील तशी इच्छा आहे”, असं सूचक भाष्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.