देशात सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम सुरू असताना पक्षांतरालाही वेग आला आहे. अनेक राज्यात विविध पक्षांमध्ये पक्षांतरे झाली आहेत. उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. परंतु, चौथ्या टप्प्यातील मतदानाआधीच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार मुकुटमणी अधिकारी यांची पत्नी स्वास्तिका माहेश्वरी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

स्वस्तिका माहेश्वरीने तिच्या पतीला घटस्फोट देण्याकरता कोर्टात अर्ज केला आहे. भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांच्या उपस्थितीत राणाघाट येथे पक्षाच्या मेळाव्यात त्या भाजपामध्ये सामील झाल्या.

“मुकुटमणी अधिकारी यांना जो कोणी मतदान करेल, त्याची माझ्यासारखीच फसवणूक होईल”, असंही ती म्हणाली. यामुळे मुकुटमणी अधिकारी यांच्यासाठी हा सर्वांत मोठा धक्का मानला जातोय. मुकुटमणी अधिकारी यांचं गेल्यावर्षीच लग्न झालं. परंतु, लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला. तिने पतीवर क्रूरतेचा आरोप केला आहे.

तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून मुकुटमणी अधिकारी यांचा अर्ज वादात सापडला आहे. २०२१ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ते राणाघाट लोकसभेच्या सातपैकी एक असलेल्या राणाघाट-दक्षिण मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले.

भाजपामधून तृणमूलमध्ये

या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, भाजपाच्या आमदारकीचा राजीनामा देण्यापूर्वी राणाघाटमधून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपने त्यांचा मुद्दा काढण्यास सुरुवात केल्याने अखेर त्यांनी गेल्या महिन्यात विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या राजकीय घडामोडीनंतर त्यांच्या पत्नीनेही भाजपात प्रवेश केला आहे.