Arvind Kejriwal LAtest Marathi News: देशामध्ये पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपा (एनडीए) आणि ‘इंडिया’ आघाडीमध्ये सामना होणार आहे. यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपा सरकारमुळे देशामध्ये हिंसाचार, भ्रष्टाचार व संघर्ष वाढला आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. तसेच भाजपाला पराभूत करूनच देशाची प्रगती करणे शक्य आहे, असे देखील केजरीवाल म्हणाले आहेत.
नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, ”२०२४ मध्ये भाजपाला पराभूत करणे हीच सर्वांत मोठी देशभक्ती ठरेल. देशाची सध्याची स्थिती खूप खराब आहे. सगळीकडे लढाई, हिंसा, भ्रष्टाचार सुरू आहे. सध्या उपलब्ब्ध असलेल्या नोकऱ्यांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. महागाई आणि भ्रष्टाचार सध्या देशासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे. त्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.” भाजपाला २०१४ व २०१९ मध्ये पूर्ण बहुमत मिळूनही त्यांनी देशाच्या विकासासाठी काहीही केलेले नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले, ”जर का तुमच्या कुटुंबाचे कल्याण व्हावे, असे वाटत असेल तर, या निवडणुकीमध्ये भाजपाला पराभूत करावेच लागेल. अंधभक्तांशी वाद न घालता, देशभक्तांशी चर्चा करावी, असा माझा सल्ला आहे. देशभक्त तुमचे बोलणे ऐकतील आणि चर्चेत सहभागीदेखील होतील. २०२४ ची लोकसभा निवडणूक देशासाठी महत्त्वाची आहे. जर का पुन्हा भाजपा (एनडीए) सरकार २०२४ मध्ये सत्तेत आले, तर ते देशाला पूर्णपणे उद्ध्वस्त करतील.”
भाजपा सरकारला पराभूत करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले असून, त्यांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. त्या आघाडीतील प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी देशाकडे आता एक पर्याय असल्याचे सांगितले. ”आधी लोक म्हणायचे त्यांच्याकडे एनडीए सरकारला दुसरा कोणताही पर्याय नाही. मात्र आता ‘इंडिया’ आघाडी स्थापन झाल्यानंतर लोक म्हणू लागले आहेत की, ‘इंडिया’ आघाडी टिकल्यास २०२४ मध्ये भाजपाचे सरकार येणार नाही”, असे केजरीवाल म्हणाले.
तसेच भाजपा सरकारने देशाची अर्थव्यवस्था बिघडवल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. नोटबंदी आणि जीएसटी कर यांसारखे कोणालाही पटकन न कळण्यासारखे निर्णय घेण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले. ”नोटबंदीमुळे भ्रष्टाचार कमी झाला नाही. नोटबंदीमुळे दहशतवादी कारवायांना आळा बसेल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते; मात्र तसे झाले नाही. २०१६ मध्ये करण्यात आलेल्या नोटबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था १० वर्षे मागे गेली आहे. त्यामुळे लोकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,” अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी व्यक्त केली.