Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा आज (८ फेब्रुवारी) निकाल जाहीर झाला आहे. दिल्लीत भारतीय जनता पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे, तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहेत. दिल्ली निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. भाजपाला ४७ तर आपला २२ जागा, तर काँग्रेसला एकही जागा या निवडणुकीत मिळालेली नाही. दिल्लीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया या दिग्गज नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. आता दिल्लीत भाजपाचं सरकार स्थापन होणार आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष इंडिया आघाडीत असूनही दिल्लीच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढले. त्यामुळे याचा फटकाही काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला बसल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आम आदमी पक्षाचे गोव्याचे प्रमुख अमित पालेकर यांनी अरविंद केजरीवाल यांना एक सल्ला दिला आहे. ‘आम आदमी पक्ष आणि काँग्रेसबरोबर आघाडी हाच पुढचा एकमेव मार्ग गोव्यात आहे’, असं अमित पालेकर यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
राजधानी दिल्लीत ‘आप’ला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर गोव्याचे ‘आप’चे प्रमुख अमित पालेकर यांनी सांगितलं की, “काही मतदारसंघात पराभवाचा फरक लक्षात घेता दोन्ही पक्ष त्यामध्ये काँग्रेस आणि ‘आप’ जर एकत्र लढले असते तर फायदा झाला असता. पण या निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सी आणि इतर घटकही महत्वाचे होते. तसेच या निवडणुकीत आम्ही काही गोष्टींना कमी लेखलं गेलं. खरं तर दिल्लीचा निकाल हा आमच्यासाठी अनपेक्षित आहे”, असंही अमित पालेकर यांनी म्हटलं आहे.
दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाची निराशाजनक कामगिरी ही गोव्यातील ‘आप’साठी एक धक्का आहे. कारण २०२६ मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्ष गोव्यात काँग्रेसबरोबर युती करण्याच्या प्रयत्नात आहे. आम आदमी पक्षाने २०२० मध्ये बेनौलिम जिल्हा पंचायत जागा जिंकून गोव्यात प्रवेश केला. तसेच २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील वेलिम आणि बेनौलिम या दोन जागा जिंकल्या होत्या.
या अनुषंगाने बोलताना अमित पालेकर यांनी म्हटलं की, “मतांच्या विभाजनाने भाजपाचा विजय होतो. हे दोन्ही पक्षांच्या केंद्रीय नेतृत्वाने समजून घेतले पाहिजे. मात्र, आता आम्ही २०२७ च्या गोव्यातील निवडणुकीकडे वेगळ्या पद्धतीने पाहत आहोत. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी आमचे चांगले संबंध आहेत. दिल्लीच्या निवडणुकीचा गोव्यावर काही परिणाम होणार नाही. गोवा आणि दिल्लीत मोठा फरक आहे. येथील लोक वेगळ्या पद्धतीने मतदान करतात. गोव्यात काँग्रेससोबत आघाडी हाच एकमेव मार्ग आहे. दोन्ही पक्षांच्या केंद्रीय नेतृत्वासह कोणाच्याही मनात शंका नसावी. वास्तवाला समोर जाणं हीच एकमेव धारणा पाहिजे’, असंही अमित पालेकर यांनी म्हटलं.