Devendra Fadnavis on Lok Sabha Election Reults 2024 : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. अद्याप अनेक मतदारसंघांमध्ये मतमोजणी चालू असली तरी सायंकाळी सात वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बहुमतापेक्षा अधिक जागा मिळवल्या होत्या. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळवता आलेलं नाही. मात्र भाजपाने त्यांच्या एनडीएतील मित्रपक्षांच्या मदतीने बहुमत मिळवलं असून ते देशात सत्ता स्थापन करणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात भाजपाची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे. भाजपाप्रणित महायुतीने राज्यात ४५+ जागा जिंकू असा दावा केला होता. तर महाविकास आघाडीने ३५+ जागा जिंकू असा दावा केला होता. अशातच महाविकास आघाडी त्यांच्या दाव्याच्या जवळ पोहोचली आहे. मात्र भाजपासह महायुतीची राज्यात मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सायंकाळी ७ वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यात काँग्रेसने १३, ठाकरे गटाने १० आणि शरद पवार गटाने ७ अशा एकूण ३० जागांवर आघाडी घेतली आहे. तर महायुतीत भाजपाने १०, शिंदे गटाने ६ जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच अजित पवार गटाने एका जागेवर विजय मिळवला आहे. राज्यात महायुती १७ जागांवर आघाडीवर आहे. या निकालानंतर महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला संपूर्ण बहुमत प्रदान केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत. मी त्यांचे आणि देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो! इंडी आघाडीतील सर्व पक्ष मिळून जितक्या जागांवर आघाडीवर आहेत, त्यापेक्षा अधिक जागा एकट्या भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. शिवाय, आंध्रप्रदेशात तेलगू देशम पार्टीच्या नेतृत्त्वात भाजपा युतीला, तर ओडिशात भाजपाच्या नेतृत्त्वात दणदणीत यश मिळाले आहे. या दोन्ही राज्यातील कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.

हे ही वाचा >> Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024 Live : उत्तर प्रदेश भाजपाच्या हातून निसटलं? देशातल्या सर्वात मोठ्या राज्याची स्थिती काय?

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात आमच्या काही जागा कमी आल्या. पश्चिम बंगालमध्ये अधिक चांगलं यश मिळेल, असं वाटत होतं. असं झालं असतं, तर भाजपा स्वबळावर ३१० च्या पुढे गेली असती. देशातील जनतेने भक्कमपणे मोदींना साथ दिली आहे. संविधान बदलणार असा खोटा प्रचार करुन जागा जिंकण्याचा प्रयत्न झाला, हे या निकालाचे दुर्दैव आहे. तरी निवडणुकीत जनतेचा जनादेश जसा असतो, तसाच स्वीकारायचा असतो. तो शिरसावंद्य मानायचा असतो. या निकालाचे सखोल चिंतन करुन विधानसभेत पुन्हा जनतेत जाऊन, या लोकसभेची कसर व्याजासह भरून काढू. महाराष्ट्रातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि महायुतीतील सर्वच घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड परिश्रम घेतले आणि ते पुढेही करणार आहेत, मी त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो!

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis reaction after bjp set back in maharashtra lok sabha election reults 2024 asc