“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही ; शेवटी राजकारण करायला…” भाजपाने साधला निशाणा!

“शरद पवारांचा पक्ष म्हणजे…” फडणवीसांनी लगावला टोला; जाणून घ्या आणखी काय म्हणाले

(प्रातिनिधिक छायाचित्र)

सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशपातळीवरील राजकारण चांगलच तापलेलं दिसत आहे. विशेष करून उत्तर प्रदेश व गोवा येथील निवडणुकांवरून महाराष्ट्रातील राजकारण गरम झालं आहे. कारण, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेले शिवसेना व राष्ट्रवादी यांनी देखील या दोन्ही राज्यांमधील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी सत्तेत असलेल्या भाजपानेही कंबर कसलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप आणि वेगवेगळी विधान केली जात आहेत. गोव्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष टीएमसी, काँग्रेसला सोबत घेऊन सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्याच्या प्रयत्नात आहे. या वरून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे. तर, गोव्याचे भाजपा प्रभारी व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

“नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागत, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं!” असं म्हणत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला आहे.

“महाराष्ट्रात ज्या प्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही”

तसेच, “निश्चतच, भाजपा गोव्यात पुन्हा सरकार बनवणार आहे. राहिला प्रश्न अटीतटीच्या लढतीचा तर आम्ही कोणतीही निवडणूक हलकी समजत नाही. परंतु आता गोव्यात सगळ्या मोठी अडचण ही आहे की, हे निश्चित होणं बाकी आहे की लढत कोणासोबत आहे. विरोधी पक्ष आपसातच स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एकदा कोणासोबत लढत आहे हे जर निश्चित झालं तर त्यावर बोलता येईल.” असं देवेंद्र फडणवीसांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

याचबरोबर, गोव्यात शरद पवार भाजपाला आव्हान देण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, “हे पाहा विरोधकांचं म्हटलं तर शरद पवारांचा पक्ष असा आहे की, ‘पानी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा… ’, मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात. कारण ती काही राष्ट्रीय पार्टी नाही. त्यांचं काही राष्ट्रीय अस्तित्वही नाही, त्यांचे काही राष्ट्रीय विचारही नाही. नाव राष्ट्रवादी नक्कीच असेल परंतु ती पश्चिम महाराष्ट्राची पार्टी आहे, थोडी महाराष्ट्राची पार्टी आहे. या पेक्षा ती मोठी पार्टी नाही.”

गोव्यात आणि उत्तर प्रदेशमध्ये १०० टक्के परिवर्तन होतंय हे लिहून ठेवा – संजय राऊत

“गोव्यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिलीय. पुढील २ दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल,” असं शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत सांगितलं होतं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis targeted ncp msr

Next Story
Uttar Pradesh election : कोविड नियमांचे उल्लंघन ; अडीच हजार ‘सपा’ कार्यकर्त्यांविरोधात FIR दाखल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी