Mumbai Maharashtra Civic Body Election 2026 : मुंबईसह २९ महापालिकांसाठीचं मतदान सुरु झालं आहे. २९ महापालिकांची ही निवडणूक ज्याकडे मिनी विधानसभा म्हणून पाहिलं जातं आहे. मुंबईसह, पुणे, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नाशिक, नागपूर यांसह सगळ्यात २९ महापालिकांमध्ये काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महापालिका असा मुंबईचा लौकिक आहे. या महापालिकेमध्ये २५ वर्षांपासून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची सत्ता होती. आता यावेळी पहिल्यांदाच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपा महायुती आणि ठाकरे बंधूंसाठी प्रतिष्ठेची

मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना भाजपा महायुती आणि ठाकरे बंधू या दोघांनीही चुरशीची केली आहे. दोघांनीही मुंबई महापालिका आम्हीच जिंकणार असा दावा केला आहे. एकीकडे विकासाचा मुद्दा घेऊन देवेंद्र फडणवीस हे प्रचारात उतरले होते. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मराठी महापौर, अदाणीकरण हे मुद्दे घेऊन जोरदार प्रचार केला. त्यामुळे मुंबई महापालिकेसाठी मतदान पार पडल्यानंतर निकाल काय लागतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई महापालिका निवडणूक

मुंबई महापालिकेत २२७ जागा आहे. महाराष्ट्रातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेतला सामना सर्वात रंज आहे. २०१७ मध्ये शिवसेनेचा महापौर बसला होता. या वेळी पक्षीय समीकरण कसं आहे? जाणून घेऊ.

महायुती : भाजपा आणि शिवसेना एकत्र लढत
उद्धव ठाकरे शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तीन पक्ष एकत्र
काँग्रेस आणि वंचित एकत्र आले आहेत.

ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत काय स्थिती आहे?

ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. तर कल्याण डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपा एकत्र आहेत. या युतीची दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे शिवसेना आणि मनसेशी लढत आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काय चित्र आहे?

पुण्यात भाजपा १६५ जागांवर निवडणूक लढवते आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार विरुद्ध भाजपा अशी लढत आहे. विशेष बाब म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष एकत्र आला आहे.

विदर्भ, मराठवाड्यात काय चित्र आहे?

नागपूरमध्ये भाजपाने १५१ म्हणजेच सगळ्या जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी त्यांचा सामना आहे.

छत्रपती संभाजी नगरमध्ये भाजपा, शिवसेना, शिवसेना उद्धव ठाकरे असा तिरंगी सामना आहे. तसंच काही भागांमध्ये AIMIM चा दबदबा आहे.

अकोला, अमरावती, लातूरमध्ये काय स्थिती आहे?

या तिन्ही शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचं भाजपासमोर मोठं आव्हान आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात काय स्थिती आहे?

नाशिक, धुळे, जळगाव आणि जालना या शहरांमध्ये भाजपा मजबूत स्थितीत आहे. मात्र या ठिकाणीही महाविकास आघाडीशी सामना आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे, मनसे, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी असा संयुक्त प्रयोग झाला आहे.

मुस्लिम बहुल शहरांमध्ये समीकरण काय?

मालेगाव, भिवंडी, नांदेड आणि छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी समाजवादी पार्टी आणि एआयएमआयएम हे पक्ष आव्हान उभं करु शकतात. या ठिकाणी महापालिका निवडणूक कशी रंगते हे पाहणंही महत्त्वाचं असेल.

कोल्हापूर, इचलकरंजी, अमरावती आणि अहिल्या नगर या ठिकाणी स्थानिक नेते, आघाड्या, अपक्ष यांचे निकाल काय लागतील यावर काही गोष्टी ठरु शकतात.