लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम जोरात सुरु आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात सामना होणार आहे. आज अनंत गीते यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची अलिबागमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. दिल्लीश्वरांना ४ जूनला महाराष्ट्राचा वाघ आला हे कळले पाहिजे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह सगळीकडे फिरत आहेत. मी मुख्यमंत्री असताना दोन चक्रीवादळे आपल्याकडे येऊन धडकली होती. त्या चक्रीवादळाचा आपण सामना केला. त्यामुळे त्या चक्रीवादळाचा सामना करणारे रायगडकर हे या फडफडणाऱ्या पंख्यांचा सामना करतील. ती दोन चक्रीवादळे होती. आताही दोन चक्रीवादळे आहेत. महाराष्ट्रावर आदळणारे हे दोन वक्री वादळं असून रायगडकर या वक्री वादळाचा सामना केल्याशिवाय राहणार नाहीत”, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर केला.

हेही वाचा : “अरे मामा जरा जपून, लक्षात ठेवा, सरळ करायला वेळ लागणार नाही”; शरद पवारांचा इशारा कुणाला?

“आता लोकसभेच्या निवडणुका टप्प्या-टप्प्याने निघायला लागल्या आहेत. निवडणुकीचे टप्पे करत असताना आपल्याला ते फुलटॉस देत आहेत. सध्या आयपीएल सुरु आहे. आयपीएल पाहत असताना खेळाडू नेमके कोठून खेळतात हे कळत नाही. हा खेळाडू मुंबईचा होता, तो तर दिल्लीकडून खेळतो. हा खेळाडू दिल्लीचा होता, तो आता हैदराबादकडून खेळतो. बोली लावून सर्व खेळतात. पण तो खेळ आहे. आता खेळासारख्या बोल्या राजकारणात लागायला सुरुवात झाली आहे. कालपर्यंत जो आपल्या पक्षात होता, तो तिकडे गेला. भाजपाची एवढी दयनीय अवस्था झाली आहे”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “आपण म्हणतो शूरा मी वंदिले आणि भाजपा काय म्हणते? तर चोरा मी वंदिले, म्हणजे चोरी कर मी तुझे वंदन करतो. भाजपावर अशी वेळ का आली? जर दहा वर्षात कामे केली असती तर ही फोडाफोडी करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आपल्या महाराष्ट्रात खेट्या घालत आहेत. शिवसेना बरोबर होती, त्यावेळी आपण त्यांना भरभरुन दिले. त्यावेळी मोदींना एवढ्या सभा महाराष्ट्रात घेण्याची गरज पडली नाही. मात्र, आता प्रत्येक गल्लीत ते फिरत आहेत. ४० पेक्षा जास्त खासदार महाराष्ट्राने दिले होते. एवढे करुनही तुम्ही महाराष्ट्राचा घात केला. आता ते आफवा पसरवत आहेत. मध्येच त्यांना माझ्याबद्दल प्रेम आलं आणि ते म्हणाले, उद्धव ठाकरेंवर संकट आल्यावर धावून जाईल, आता संकट आणून तर पाहा”, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former chief minister uddhav thackeray criticism of pm narendra modi and amit shah lok sabha constituency politics gkt