UP Election: आरपीएन सिंह यांचा भाजपात प्रवेश ; काँग्रेसकडून समोर आली प्रतिक्रिया

जाणून घ्या कोण काय म्हणालं आहे ; निवडणुकी अगोदर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि यूपीए सरकारमध्ये मंत्री राहिलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आरपीएन सिंह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. तसेच, त्यांनी आज दिल्लीत भाजपाच्या मुख्यालयात जाऊन पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जात आहे.

आरपीएन सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनामा पाठवला आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, “आज, जेव्हा संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, तेव्हा मी माझ्या राजकीय जीवनात एक नवीन अध्याय सुरू करत आहे. मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला देश, जनता आणि पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.”

आरीपएन सिंह यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसकडूनही प्रतक्रिया समोर आली. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी म्हटलं की, “मला अद्याप अधिकृतरित्या माहिती नाही की ते कोणत्या पक्षात जात आहेत. माझं म्हणणं आहे की, ही जी लढाई आहे, जी लढाई काँग्रेस लढत आहे आणि प्रियंका गांधी यांनी अगोदरही उल्लेख केलेला आहे. ही लढाई अतिशय कठीण आहे आणि ही लढाई धैर्याने, शौर्यानेच लढली जाऊ शकते. कारण ही लढाई तुम्ही एका अहंकारी सरकारच्याविरोधात लढत आहात आणि ही लढण्यासाठी हिंमत पाहिजे. ही सत्याची लढाई आहे, तत्वांची लढाई आहे. जसं की प्रियंका गांधी म्हणतात की, जे भित्रे आहेत ते ही लढाई नाही लढू शकत. जो जिथे जात आहे आम्ही त्याला आमच्याकडून नक्कीच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत आहोत आणि आम्ही अपेक्षा करतो, कदाचित त्यांना कालांतराने हे समजेल की चिकाटीने लढाई लढणे वीरांची निशाणी आहे. ”

तर, आरपीएन सिंह यांनी आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे ट्विटही केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्या दूरदर्शी नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली मी राष्ट्र उभारणीत माझ्या योगदानासाठी मी तत्पर आहे., असे त्यांनी ट्विट केले आहे.

तसेच, ”मी ३२ वर्षे एका राजकीय पक्षात (काँग्रेस) घालवली. पण तो पक्ष पूर्वीसारखा राहिला नाही. भारतासाठी पंतप्रधान मोदींची जी स्वप्नं आहेत ती पूर्ण करण्यासाठी मी ‘कार्यकर्ता’ म्हणून काम करेन.” असं आरपीएन सिंह यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर बोलून दाखवलं.

स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणी वाढणार…

न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आरपीएन सिंह कुशीनगरच्या त्यांच्या गृहजिल्ह्यातील पडरौना मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. जर सिंग यांनी पडरौना मधून निवडणूक लढवली तर, स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते, कारण स्वामीही या जागेवरून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहेत. स्वामींच्या विरोधात भाजपा आरपीएन सिंग यांना उमेदवारी देऊ शकते. पदरौना राजघराण्यातील असलेल्या आरपीएन सिंह यांचे पूर्ण नाव कुंवर रतनजीत प्रताप नारायण सिंह आहे. पडरौना हे यूपी आणि बिहारच्या सीमेवर वसलेले शहर आहे. कुशीनगर आधी देवरिया जिल्ह्यात होते. पण आता ते वेगळे करून कुशीनगर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले आहे.

सिंग यांची राजकीय कारकीर्द..

सिंग १९९६, २००२ आणि २००७ च्या विधानसभा निवडणुकीत या पडरौना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आरपीएनचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. यानंतर, २००९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून ते खासदार झाले आणि मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये गृह राज्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. मात्र, त्यानंतरच्या निवडणुकीत त्यांना सतत पराभव पत्करावा लागला होता.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former union minister and congress leader rpn singh joins bharatiya janata party in delhi msr

Next Story
UP Election: काँग्रेसला मोठा झटका; स्टार प्रचारक आरपीएन सिंग यांचा राजीनामा, भाजपात करणार प्रवेश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी