Gangakhed Assembly Constituency Ratnakar Gutte : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, त्यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. दरम्यान, या मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे? २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते? आणि या मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे? याविषयी जाणून घेऊया.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय?
गंगाखेड हा भाग हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, त्यानंतर भाजपाने या ठिकाणी आपली पकड मजबूत केली. मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार झालेल्या फेररचनेनुसार या मतदारसंघात गंगाखेड, पालम आणि पुर्णा या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकीत तीन वेगळ्या पक्षाच्या आमदारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलं. २००९ अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट यांनी विजय मिळवला. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुसूदन केंद्रे आणि २०१९ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नाकर गुट्टे यांनी विजय मिळवला.
हेही वाचा – अमरावती जिल्ह्यात जुन्या-नव्या चेहऱ्यांचा संघर्ष!
२०१९ च्या निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपाने आपला मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडला होता. राष्ट्रीय समाज पक्षाने रत्नाकर गुट्टे यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरोधात अविभाजीत शिवसेनेने विशाल कदम यांना, अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने मधुसूदन केंद्रे यांना रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत रत्नाकर गुट्टे यांचा १८ हजार ५८ मतांनी विजय झाला होता. गुट्टे यांना एकूण ८१ हजार १६९ मते, विशाल कदम यांना ६३ हजार १११ मते, तर मधुसूदन केंद्रे यांना एकूण ८ हजार २०४ मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार सीताराम घांडट ५२ हजार २४७ मतांसह तिसऱ्या स्थानी होते. तर वंजित बहुजन आघाडीच्या करुणाबाई खुंदगीर यांना २८ हजार ८३७ मते मिळाली होती.
हेही वाचा – अर्ज भरण्याची वेळ चुकवणारे अनिस अहमद पुन्हा काँग्रेसमध्ये
या मतदारसंघाची सद्यस्थिती काय?
हा मतदारसंघ सध्या भाजपाचा मित्र असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाकडे आहे. रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीपासून फारकत घेत राष्ट्रीय समाज पक्षाने राज्यात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. मात्र, असं असलं तरी भाजपाने या मतदारसंघात उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे भाजपाने एकप्रकारे रत्नाकर गुट्टे यांना पाठिंबा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेला आहे. या मतदारसंघात शिवेसनेने ( उद्धव ठाकरे गट) विशाल कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळेगंगाखेडमध्ये रत्नाकर गुट्टे विरुद्ध विशाल कदम अशी थेट लढत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे रत्नाकर गुट्टे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी नाही. त्यांना भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोध आहे. त्याचा फटका यंदाच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.