“मनोहर पर्रीकर आजारी असताना तुमची काय भूमिका होती हे..”; संजय राऊतांना फडणवीसांचे उत्तर

संजय राऊतांना नटसम्राटमध्ये भूमिका द्यायला हवी. कारण ते सकाळी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं बोलायची उत्तम भूमिका करू शकतात, असे फडणवीस म्हणाले

devendra fadnavis sanjay raut

गोव्यासह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत राजकीय खलबते सुरू आहेत. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या बंडखोरांनी जवळपास सर्वच पक्षांच्या अडचणी वाढवल्या आहेत. गोव्यातही असेच काहीसे घडत आहे. गोव्यात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी भाजपाच्या अडचणी वाढवल्या आहेत. शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत उत्पल पर्रिकर यांना सतत पाठिंबा दर्शवत असून एकदा भाजपावर टीका केली आहे. त्यावर आता गोव्याचे भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.

“उत्पल पर्रीकरांच्या बाबतीत परिस्थितीनुसार उत्तर मिळणार आहे. संजय राऊतांना नटसम्राटमध्ये भूमिका द्यायला हवी. कारण ते सकाळी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं बोलायची उत्तम भूमिका करू शकतात. मनोहर पर्रीकर आजारी असताना त्यांनी विधानसभेमध्ये जाऊन बजेट मांडले होते तेव्हा संजय राऊतांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि गोव्यातले सरकार आजारी आहे, सरकार चालवणे अयोग्य आहे, असे सांगितले होते. आता तेच संजय राऊत मगरीचे अश्रू वाहत आहेत आणि उत्पल पर्रीकरांबद्दल बोलत आहेत. मनोहर पर्रीकर जेव्हा आजारी होते तेव्हा तुमची काय भूमिका होती हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे राजकीय सोयीची भूमिका घेणे आणि नटसम्राटासारखे वागणे बंद केले पाहिजे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही९ सोबत बोलताना दिली.

“संजय राऊतांचे तिथे ऐकायला कोण बसलं आहे? ”; उत्पल पर्रीकरांना पाठिंबा देण्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

“काँग्रेसलासुद्धा माहिती आहे की शिवसेनेला गोव्यात सोबत घेतले तर त्यांच्या मतदारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने तोंडावर शिवसेनेला सांगितले की, आम्ही तुम्हाला सोबत घेऊ शकत नाही. शिवसेनेला काँग्रेसने झिडकारले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत आली तरी काय फरक पडणार आहे? तृणमूल काँग्रेसला लोकांनी इथे स्विकारल्याचे मला वाटत नाही. बंगालच्या निवडणुकांनंतर जो हिंसाचार झाला त्यानंतर ममता बॅनर्जी शांत बसल्या होत्या. हे लोकांनी पाहिले आहे. केजरीवालांनी दिल्लीत सांगितलेल्या गोष्टी ते नाही करु शकले,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काय म्हणाले होते संजय राऊत?

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मनोहर पर्रिकरांचा मुलगा इकडे तिकडे फिरत असून त्याला अपमानित केलं जात आहे. त्याची औकात काढली जात आहे. मग तिकीट देण्याची चर्चा कधीपासून सुरु झाली. उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिल्यास आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितल्यानंतर भाजपाची धावपळ सुरु झाली आहे. त्यांना तिकीट द्यावंच लागेल”.

दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने पणजीतून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्व पक्षांनी उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. भाजपाच्या दिग्गज नेत्याला हीच खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी म्हटले होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goa assembly election shivsena sanjay raut former goa cm manohar parrikar son utpal parrikar devendra fadnavis abn

Next Story
UP Elections 2022: पंतप्रधान मोदींनी वाराणसीतल्या भाजपा कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र; म्हणाले…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी