scorecardresearch

गोवा निवडणुकीसाठी भाजपा सज्ज; उमेदवारांची पहिली यादी जाहीर, उत्पल पर्रिकरांना उमेदवारी नाहीच!

गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा आज झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

पाच राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आहे. त्यापैकी गोवा विधानसभा निवडणुकांकडे सर्वच पक्षांचं विशेष लक्ष आहे. आत्तापर्यंत जवळपास सगळ्या पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र भाजपा कोणाला उमेदवारी देतं, याकडे लक्ष लागून राहिलं होतं. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांची उमेदवारी. आता भाजपाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

गोव्यातील ४० पैकी ३४ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा आज झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंग यांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर केली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना मात्र भाजपाने उमेदवारी नाकारली आहे.

देवेंद्र फडणवीस हे देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांनी यावेळी बोलताना राज्यातल्या भाजपाने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. तसंच या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पक्षांवर टीकाही केली. फडणवीस म्हणाले, “गेले १० वर्ष भाजपाने गोव्यामध्ये स्थिरता आणि विकास हा मूलमंत्र अवलंबला आहे. गोव्यातल्या राजनैतिक अस्थिरतेला भाजपाने संपुष्टात आणलं. गोव्याला विकासाचा नवा मार्ग भाजपानेच दाखवला”. विरोधी पक्षांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “गोव्यात सगळ्यात जास्त घोटाळे काँग्रेसच्या कार्यकाळात झाले आहेत. एकही दिवस असा जात नव्हता की ज्या दिवशी कोणताही मोठा घोटाळा झालेला नाही. काँग्रेसने गोव्याची प्रतिमा अत्यंत खराब केली”.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Goa assembly elections 2022 utpal parrikar bjp candidates in goa vsk