गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पणजी मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी नुकतीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जर पर्रिकरांच्या कुटुंबाने हिंदुत्त्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शिवसेना त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल. उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलं होतं. मात्र आता यावरुन गोव्यातील स्थानिक शिवसैनिकांनी विरोध दर्शवल्याची माहिती, शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी दिलीय. त्यामुळे उत्पल पर्रिकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेनेमध्येच दोन मतप्रवाह असल्याचं चित्र दिसत आहे.

राऊत काय म्हणालेले?
उत्पल पर्रिकर अपक्ष लढणार असतील तर सर्वच राजकीय पक्षांनी मतभेद विसरून उत्पल पर्रिकरांच्या मागे ठामपणे उभं रहावं, अशी आमची भूमिका आहे, असं राऊत म्हणाले होते. “आम आदमी पार्टी, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि तृणमूल काँग्रेसने उत्पल यांच्या विरोधात उमेदवार देऊ नये. हीच दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना खरी श्रद्धांजली असेल,” असं राऊत यांनी ट्वीट करून म्हटलं होतं.

हा फार मोठा अन्याय…
“मी आज गोव्यामध्ये पण सांगितलं की उत्पल पर्रिकरांना तिकीट दिलं नाही हा फार मोठा अन्याय आहे. पर्रिकरांचा मुलगा म्हणून हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे. जे मनोहर पर्रिकर गोव्यामधली ४० तिकीटं वाटायचे, त्यांच्याच मुलाला तिकीट न देणं हा फार मोठा अन्याय आहे,” असं उदय सामंत म्हणाले.

शिवसैनिकांचं म्हणणं काय?
“शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलीय. आज मी गोव्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी भेटलो तेव्हा शिवसैनिकांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की उत्पल पर्रिकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. निवडून आल्यानंतर ते भाजपात जाणार नाही याची पूर्ण खात्री शिवसैनिकांना दिली पाहिजे. यानंतर उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊत यांनी निर्णय घ्यावा अशी गोव्यातील शिवसैनिकांची भूमिका आहे. हीच भूमिका मी शिवसैनिक आणि नेत्यांमधील दुवा या नात्याने संजय राऊत यांच्याकडे मांडलीय. तशी मी ही भूमिका उद्धव ठाकरेंकडेही मांडणार आहे,” असं उदय सामंत म्हणालेत.

महाविकास आघाडी सरकार आहे…
कॉंग्रेसचे सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचं म्हटलं आहे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षांना जर काही गैरसमज झाला असेल तर मी पालकमंत्री म्हणून स्वत: भेटून यावर मार्ग काढू. नगरपंचायत निवडणूकीत वेगवेगळे लढलो असलो तरी महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामुळे आपला विरोधक कोण आहे ते ओळखून महाविकास आघाडीत सामील व्हावं. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष हे राजकीय परिपक्व आहेत ते योग्य निर्णय घेतील, असंही कुडाळ नगरपालिकेबद्दल बोलताना उदय सामंत यांनी म्हटलंय.