गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख अगदी जवळ येऊन ठेपली आहे. राज्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. अवघ्या ४० जागांच्या गोवा निवडणुकीनं देखील यंदा चांगलीच चर्चा घडवून आणली आहे. पंतप्रधान ते केंद्रीय मंत्री गोवा राज्यात सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. या राज्याच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांची. उत्पल यांना भाजपाने उमेदवारी नाकारली आणि गोव्याच्या राजकारणाची दिशा बदलली. उत्पल पर्रीकरांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेने त्यांना पाठिंबा जाहीर केला आणि शिवसेना उमेदवाराने माघार घेतली होती. दरम्यान आता उत्पल पर्रीकरांनी महत्वाची माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात आपल्या बाजूने एक मूक लाट असल्याचं उत्पल पर्रीकर म्हणाले आहेत. पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर राजकारणात लोकांची त्यांना पसंती असल्याचे सांगितले. वडिलांचे निधन झाल्यानंतर २०१९ मध्ये आपण तिकीट मागितले होते, परंतु स्थानिक राजकारणामुळे भाजपाने त्यांना तिकीट नाकारले होते, असं त्यांनी सांगितलं.

“गोव्यात मुख्य विरोधक शिवसेना, आप, टीएमसी नाही, तर…”; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचं वक्तव्य

“२०१९ मध्ये स्थानिक राजकारणामुळे मला तिकीट नाकारण्यात आले आणि मी पक्षाच्या निर्णयाचे पालन केले, परंतु नंतर काँग्रेसमधून एका व्यक्तीला आणण्यात आले आणि त्याला उमेदवारी देण्यात आली. त्या व्यक्तीवर   इतके घृणास्पद आरोप होते की मला याबद्दल बोलण्याची देखील लाज वाटते,” असं उत्पल पर्रीकर पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले.

“एवढ्या कष्टाने माझ्या वडिलांनी सांभाळलेला हा मतदारसंघ त्यांच्या हातात जावा, आम्ही शरणागती पत्करावी हे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत मी शांतपणे कसा बसू शकतो? त्यामुळे जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने मला निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले,” असे ते म्हणाले.

Goa Election 2022: “भाजपाला गोव्यात ४० पैकी ४२ जागा मिळतील”

पणजीऐवजी भाजपाने देऊ केलेल्या तीन पर्यायांबद्दल विचारले असता ते म्हणाले, “लढाई कधीही पर्यायांसाठी नव्हती. मी म्हटलं होतं की चांगला उमेदवार द्या आणि मी स्पर्धा सोडेन, परंतु तसं झालं नाही. त्यामुळे मी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि मला माझ्या लोकांचा पाठिंबा मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व गोवा विधानसभा निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silent wave in my favour utpal parrikar ahead of goa election hrc
First published on: 11-02-2022 at 14:42 IST