शिवसेना नेते संजय राऊत यांनी गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माध्यमांशी बोलताना भाजपावर निशाणा साधला. तसेच, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिरकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी काल भाजपाल सोडचिठ्ठी दिल्यावरूनही त्यांनी भाजपावर टीका केली आहे. तसेच, गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिट जप्त होईल, असं भाजपा नेत्यांकडून सांगितलं जात असल्याबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया देत भाजपावर निशाणा साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“उत्पल पर्रिकर यांची वेदना मी समजून घेऊ शकतो. ज्या पक्षात त्यांचा जन्म झाला, तो पक्ष सोडताना किंवा त्या पक्षापासून दूर जाताना कशा वेदना होतात, हे मी काल त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवलेलं आहे. नक्कीच आमच्या सगळ्यांच्या त्याना शुभेच्छा आहेत.” असं संजय राऊत म्हणाले. तसेच, “ डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे. ” असंही यावेळी त्यांनी भाजपाला प्रत्युत्तर देताना बोलून दाखवलं.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “उत्पल पर्रिकर हे अपक्ष लढताय ही चांगली गोष्ट आहे. भाजपाने हे त्यांच्यावर थोपवलं आहे. मनोहर पर्रिकर हे गोव्याचे एक असे नेते होते, ज्यांनी गोव्याचं नाव देशभरात उंचावलं होतं. राजकीय चारित्र्य कसं असलं पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं होतं. परंतु त्यांच्या मुलाला ज्या पद्धतीने गोव्यात, देशाच्या राजकारणात अपमानित केलं गेलं. हे गोवाच्या जनतेला पटलेलं नाही. आता उत्पल पर्रिकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि स्वतंत्र उमेदवार म्हणून पणजीतून लढणार असल्याची घोषणा देखील केली आहे. आता लढाई होईल बेईमान विरुद्ध चारित्र्य. उत्पल यांच्यासमोर पणजीत, ज्या पणजीचं मनोहर पर्रिरकर यांनी नेतृत्व केलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही(भाजपाने) अशा व्यक्तीला उमेदवार बनवलं आहे. ज्याच्यावर भ्रष्टाचार, माफियागिरी, बलात्कार असे सगळेच आरोप त्याच्यावर आहेत. असा उमेदवार भाजपाचा चेहरा बनून पणजीत उभा आहे आणि मोदी त्याच्या प्रचारासाठी येतील? आश्चर्याची बाब आहे, मोदी, अमित शाह येतील प्रचाराला. देवेंद्र फडणवीस तर तिथेच बसलेले आहेत. मग आता उत्पल पर्रिकर आणि हे सगळेजण असा सामना होईल आणि आम्ही सगळेजण उत्पल पर्रिकरासांठी शुभेच्छा देतो.”

तसेच, “भाजपाने जी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्या सर्वाचं चारित्र्य प्रमाणपत्र माझ्याकडे, शिवसेनेकडे आहे. मी परत गोव्यात जाईन आणि ते जनेतेसमोर आणेल.” असंही यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

पक्ष वाढवण्यासाठी अशा निवडणुका लढाव्या लागतात, पण –

याचबरोबर गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिटही वाचणार नाही, असं भाजपाचे नेते म्हणत आहेत, यावर बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, “१९८९ पासून भाजपा गोव्यात काम करतोय आणि सलग दोन निवडणुकात त्यांचं डिपॉझिट गेलं होतं. डिपॉझिट गेलं म्हणून निवडणुका लढायच्याच नाहीत, असं काही निवडणूक आयोगाने म्हटलेलं नाही. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, पक्षाचा विस्तार करायचा आहे. गोव्या सारख्या राज्यात पक्ष वाढवण्यासाठी अशा निवडणुका लढाव्या लागतात. पण यावेळी तर चित्र वेगळं आहे. डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू. बचेंगे तो और भी लढेंगे. हा मराठा साम्राज्याचा एक मंत्र आहे. पानीपतावर देखील दत्ताजी शिंदे हे घायाळ होऊन पडले आणि शेवटपर्यंत म्हणत होते की बचेंगे तो और लढेंगे आणि आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही जर तुमच्या सारखे भ्रष्ट, माफिया, व्यभिचारी, धनदांडगे यांना जर तिकीटं दिली असती तर आम्ही कधीच सत्तेत आलो असतो. पण आम्ही आमचं, बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं चारित्र्य कायम ठेवलं.”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa election even if the deposit is gone we will continue to fight sanjay rauts reply to bjp msr
First published on: 22-01-2022 at 10:52 IST