शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) गोव्यात शिवसेनेच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल गोव्यात झालेल्या सभेवरून निशाणा साधला. तसेच, गोव्यात जर भगवा झेंडा कुठला फडकायचा असेल तर तो फक्त शिवसेनेचा, हिंदुत्वाचा, मराठी माणसाचा असणार.असंही त्यांनी बोलून दाखवलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत प्रचार सभेत बोलताना म्हणाले की, “हा गोव्याचा बुलंद आवाज आहे की आता आम्हाला शिवसेना हवी आहे. जिथे जिथे आम्ही घराघरात जातोय, तिथे सांगतात की तुम्ही आधी का नाही आलात. आम्ही तुमची वाट पाहत होतो तुम्ही आधी का नाही आलात. आज आपण इथे आलेलो आहोत. गोव्यात शिवसेना नवीन नाही, आम्ही येतोय, लढतोय, काम करतोय पण यावेळी आदित्य ठाकरे यांनी ठरवलं की आपण जोरदार लढाई करायची. गोव्यात विधानसभेत आमदार जातील आणि भविष्यात गोव्यावर शिवसेनेचं राज्य येईल, अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालं पाहिजे.”

“काल गोव्यात पंतप्रधान होते, ते म्हणाले गोव्याशी माझं जुनं नातं आहे. मग आमचं काय आहे? तुमचं नातं आहे आणि आमचं काय आहे? जर गोव्याशी कुणाचं जुनं नातं असेल तर ते शिवसेनेचं आहे आणि महाराष्ट्राचं आहे. तुम्ही गोव्याची भाषा, संस्कृती, आमच्या सगळ्यांचे देव गोव्यात आणखी काय नातं पाहिजे. अजून काय नात्याचं तुम्हाला प्रमाणपत्र आणून दाखवू. अर्धे गोवेकर मुंबईत आहेत आणि जे आहेत ते सगळे शिवसेनेत आहेत. त्यामुळे आम्हाला नाती-गोती सांगू नका. गोव्यातला जो मूळ पक्ष आहे त्या पक्षाचं नावचं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आहे, हे नातं आहे आमचं आणि त्या पक्षाचे जे पहिले मुख्यमंत्री होते भाऊसाहेब बांदोडकर, त्यांची आणि बाळासाहेबांची जीवलग मैत्री होती. आम्ही शिवसेना इथे आलो नाही कारण बाळासाहेब आम्हाला सांगायचे, अरे भाऊसाहेबांचा पक्ष शिवसेनेचंच काम करतोय. ते हिंदुत्वाचा मराठी माणसाचा आवाज बुलंद करत आहेत, ते आपलच काम करत आहेत. आपल्याला जायची गरज नाही, हे आमचं बाळासाहेबांचं विशाल हृदय होतं.”

Goa election : “शिवसेना आली म्हणजे नक्की काय असतं? हे गोव्याच्या राजकारणाला आता कळायला लागलय”

“परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आता आम्ही ठरवलं आहे की गोव्यात जर भगवा झेंडा कुठला फडकायचा असेल तर तो फक्त शिवसेनेचा, हिंदुत्वाचा, मराठी माणसाचा. म्हणून आज आम्ही सगळे इथे व्यासपीठावर आहोत. ज्यांचा ज्यांचा कोकण आणि गोव्याशी संबध आहे ते सगळे आज इथे आहेत, तुम्ही सर्वजण आहात. संपूर्ण गोवा पिंजूण काढला आहे, तुम्ही कुठेही जा तुम्हाला शिवसेनेची चर्चा दिसेल. हे आले आहेत आणि आता हे काहीतरी घेऊनच जाणार आहेत. म्हणून माझं शिवसैनिकांना एकच सांगणं आहे की पुढील ७२ तास महत्वाचे आहेत. प्रत्येक घरापर्यंत पोहचू . ”

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa election sanjay raut targets prime minister narendra modi msr
First published on: 11-02-2022 at 17:09 IST