Gujarat Election 2022 : मतदानापूर्वी भाजपा उमेदवार पीयूष पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला | Gujarat Election 2022 attack on BJP candidate Piyush Patel before polling msr 87 | Loksatta

Gujarat Election 2022 : मतदानापूर्वी भाजपा उमेदवार पीयूष पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला! 

हा हल्ला काँग्रेस उमेदवारांच्या समर्थकांनी केल्याचा भाजपाने आरोप केला आहे.

Gujarat Election 2022 : मतदानापूर्वी भाजपा उमेदवार पीयूष पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला! 
(फोटो : वीडियो स्क्रीनशॉट Twitter)

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (गुरुवार) सौराष्ट्र-कच्छ प्रांत व दक्षिणेकडील १९ जिल्ह्यांतील ८९ मतदारसंघांत मतदान होत आहे. या टप्प्यात ७८८ उमेदवार रिंगणात आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचला या टप्प्यासाठीचा निवडणूक प्रचार थांबला होता. तर आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान होणार आहे. दरम्यान या मतदानाच्या अगोदर नवसारी जिल्ह्यातील वांसदा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार पीयूष पटेल वर अज्ञात लोकांनी हल्ला केला आहे.

या हल्ल्यात पटेल जखमी झाले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान पीयूष पटेल हे वांसदा मतदारसंघातील झरी गावात होते. भाजपाने काँग्रेस उमेदवार अनंत पटेल यांच्या समर्थकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. वंसदा ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीयूष पटेल समर्थकांनी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वंसदा गुजरातमधील नवसारी जिल्ह्याचा भाग आहे आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारासाठी हा मतदारसंघ आरक्षित आहे.

२०१७ मधील निवडणुकीत भाजपने या टप्प्यात ८९ पैकी ४८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने ४० जागा जिंकल्या होत्या व एक अपक्ष उमेदवार निवडून आला होता. या टप्प्यात सर्व ८९ जागांवर भाजप-काँग्रेसने उमेदवार उभे केले आहेत. तर ‘आप’ने ८८ उमेदवार उभे केले आहेत. बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय ट्रायबल पार्टीसह (बीटीपी) इतर ३६ राजकीय पक्षांनी विविध जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ३३९ अपक्ष रिंगणात आहेत. गुजरातमधील एकूण चार कोटी ९१ लाख ३५ हजार ४०० पैकी दोन कोटी ३९ लाख ७६ हजार ६७० मतदार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान करण्यास पात्र आहेत. एकूण १४,३८२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यापैकी तीन हजार ३११ केंद्र शहरी भागात व ११ हजार ०७१ केंद्र ग्रामीण भागात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२२ ( Elections ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 14:14 IST
Next Story
चुनावी हिंदू: राहुल गांधींच्या महाकाल मंदिर भेटीचा भाजपानं जोडला गुजरात निवडणुकीशी संबंध