PM Narendra Modi Oath Ceremony Updates, 9 June 2024 : देशात एनडीएने बहुमत प्राप्त केले असून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यासबोतच ३० खासदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कोणती खाती मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्यात सात जागा जिंकल्या आहेत. अजित पवार गटाने १ तर, भाजपाने ९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे राज्यात कोणती मंत्रिपदे मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. परंतु, एकनाथ शिंदे हा दावा फेटाळून लावला आहे.

महाराष्ट्रात किती मंत्रीपदे मिळणार?

महाराष्ट्रातून शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, पवार गटाचे प्रफुल पटेल यांना मंत्री केले जाऊ शकते. भाजपमधून नारायण राणे व उदयनराजे भोसले व रिपब्लिकन पक्षातून रामदास आठवले यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो.

हेही वाचा >> Modi 3.0 : बहुमत गाठण्यासाठी मदत करणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारांना कोणती खाती मिळणार? ‘या’ मंत्रिपदांकडे लक्ष!

एकनाथ शिंदे गटातून या दोन नावांची चर्चा

केंद्रात दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळत असल्याचे समोर येताच या पदासाठी मुख्यमंत्र्यांनी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि मावळमधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले श्रीरंग बारणे यांच्या नावाची निवड केल्याचे सांगितले जाते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी या नावांविषयी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधल्याचे समजते.

केंद्रात महायुती महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला यंदा किमान दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळतील अशी शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून यासाठी काही नावे चर्चेत असली तरी त्यांचे खासदार पूत्र श्रीकांत शिंदे यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी पक्षाच्या काही खासदारांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना भेटून केली होती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे यांचा समावेश असणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. शिवेसना हा पक्ष माझी खासगी मालमत्ता नाही. श्रीकांत यांनाही पक्षाच्या कामातच स्वारस्य आहे. त्यामुळे शिवसेनेतील मंत्रिमंडळाचा निर्णय गुणवत्तेनुसार होईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >> आज रालोआचा शपथविधी; मंत्रिमंडळात पहिल्या टप्प्यात ३० जणांच्या समावेशाची शक्यता

“मला पक्ष संघटनेचं काम तळागाळात पोहोचवण्यात जास्त रस आहे. येणाऱ्या काळात मला ग्रामीण भागात पक्ष वाढवण्यासाठी काम करायचे आहे. मी तिसऱ्यांदा खासदार झालो आहे. लोकांना तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास ठेवला आहे. याचं मला समाधान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मला स्वत: मंत्रीपदाबाबत विचारलं तर मी त्यांना नकार देईल”, असे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं.